कोल्हापुरातील लाईन बाजार मध्ये भाजपाच्या वतीने पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

कोल्हापुरातील लाईन बाजार मध्ये भाजपाच्या वतीने पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

 कोल्हापूर (प्रतिनिधी) - गेल्या ११ वर्षात देशात प्रगतीचे पर्व सुरू झाले आहे. वेगवेगळ्या राज्यात स्थानिक साधन संपत्तीतून त्या त्या राज्याची आर्थिक, सांस्कृतीक प्रगती होत आहे. महिला सक्षमीकरण सुरू आहे. क्रिडा, पर्यटन क्षेत्राची उन्नती होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती होत आहे. वेगवेगळ्या राज्यांचा ब्रँड विकसीत होतोय. त्यामुळे अर्थप्राप्ती आणि प्रगतीचे पाऊल पुढे पडत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. कोल्हापुरातील लाईन बाजार मध्ये भाजपाच्यावतीने पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले होते. यावेळी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी आणि खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारच्या प्रगतशिल वाटचालीचा आढावा घेतला.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना विविध राज्यात सुरू असलेल्या प्रगतीविषयी माहिती दिली जाते. आज लाईन बाजार इथल्या भाजपा बुथच्यावतीने केंद्रीय महिला बालकल्याण विकासमंत्री अन्नपूर्णा देवी तसेच खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून मन की बात कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले होते. आणीबाणीच्या काळात ज्या नागरिकांनी संयमाने परिस्थितीचा सामना केला, त्यांना योध्दा असे संबोधले पाहिजे. बोडो लँड मधील संघर्ष संपलाय, तिथे प्रगतीचे पर्व सुरू झाले आहे. फुटबॉलच्या स्पर्धा लोकप्रिय होत आहेत. ७० हजार खेळाडू तिथे फुटबॉलचे सामने खेळत आहेत. निरोगी जीवन आणि विकासाच्या मार्गावर बोडो लँड वाटचाल करत आहे. मेघालयाने सिल्क उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. जगभरात या सिल्कची अहिंसा सिल्क अशी ओळख झाल्याचे सांगून, व्होकल टू लोकल म्हणजेच स्थानिक कलाकारांना बळ द्या, तिथल्या कला संस्कृतीला पाठबळ द्या, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

तेलंगणा राज्यात महिलांनी कडधान्यांपासून बनवलेली बिस्कीटे देश-विदेशात प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. काही राज्यात सॅनिटरी नॅपकीनच्या व्यवसायातून मोठ्याप्रमाणात महिला आर्थिकदृष्टया सक्षम होत आहेत. कर्नाटकातील कलबुर्गीच्या महिलांनी ज्वारीच्या भाकरीचा ब्रँड निर्माण केला आहे. मध्यप्रदेशातील बालाघाट येथे मशरूमची शेती आणि पशुपालन व्यवसाय तेजीत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. तसेच पर्यावरण रक्षणासाठी उल्लेखनीय काम करणार्‍या पुण्यातील कुटुंबाचा उल्लेख मोदी यांनी केला.

गुजरात मधील अहमदाबाद येथे मिशन फॉर मिलेनियम ट्री हा उपक्रम पर्यावरण रक्षणाला बळ देणारा ठरत आहे. तर महाराष्ट्रातील पाटोदा इथल्या ग्रामस्थांनी कचरा, सांडपाणी व्यवस्थापन तसेच नैसर्गीक स्त्रोतांपासून बनवलेल्या विजेचा वापर कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टर आणि चार्टर्ड अकौंटंट हे देशाचं आरोग्य आणि अर्थ व्यवस्थापन योग्यप्रकारे करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्राच्या कार्याचे कौतुक देखील त्यांनी केले.

दरम्यान ना. अन्नपूर्णा देवी आणि खासदार धनंजय महाडिक यांनी, केंद्र सरकारच्या प्रगतशील वाटचालीचा आढावा घेतला. या उपक्रमासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्याप्रमाणात उपस्थिती लावली होती. दरम्यान कसबा बावडा मंडलच्यावतीने नामदार अन्नपूर्णा देवी आणि खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शहर अध्यक्ष विजय जाधव, माजी नगरसेवक आशिष ढवळे, मुडशिंगी सरपंच तानाजी पाटील, माजी नगरसेवक प्रदीप उलपे, चंद्रकांत घाटगे, डॉ. सदानंद राजवर्धन, धिरज पाटील, मनोज इंगळे, अमर साठे, रवी पवार, रवी पोवार, रहिम सनदी यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.