गाय दूध खरेदी दर कपात मागे घ्या : पशुपालकांचे अध्यक्ष अरुण डोंगळेंना निवेदन

गाय दूध खरेदी दर कपात मागे घ्या : पशुपालकांचे अध्यक्ष अरुण डोंगळेंना निवेदन

वडणगे (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाने गाय दूध - खरेदी दरात तीन रुपयांची कपात केली आहे, ती मागे घ्यावी अशी मागणी  पशुपालकांच्या शिष्टमंडळाने संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 



गोकुळ दूध संघाने यापूर्वी दोन वेळा गाय दूध खरेदी दरात कपात केली. पुन्हा २१ नोव्हेंबरला खरेदी दरात तीन रुपयांची कपात केली. पशुपालक आधीच लॉकडाऊन, लम्पी, अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पशुपालन व्यवसाय सुरळीत सुरू असताना अचानक संघाने दूध खरेदी दरात कपात करून पशुपालकांना अडचणीत आणले आहे. पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच वारंवार दूध खरेदी कपात केली जात आहे. पशुपालन व्यवसायासाठी युवा पिढीला चालना देणे गरजेचे असताना दूध खरेदी दरात कपात करून हा व्यवसाय अडचणीत आणला जात आहे, असे शिष्टमंडळाने अध्यक्ष अरुण डोंगळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

... अन्यथा तीव्र आंदोलन 

दूध व्यवसाय जोखमीचा व आर्थिकदृष्ट्या परवडत नसताना, दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची कपात केली आहे. ही कपात शेतकऱ्यांच्या मुळावर आली असून, विधानसभा निवडणूक संपल्यानंतर तातडीने दरात कपात करून दूध संघांनी शेतकऱ्यांच्या मानेवर पाय दिला आहे. ही कपात मागे घेऊन पूर्ववत दर द्यावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा सांगरूळ (ता. करवीर) येथील दत्त दूध संस्थेचे अध्यक्ष विलास नाळे यांनी पत्रकातून दिला आहे. एकीकडे गाय दुधाचे दर कमी आहेत, म्हणून राज्य शासन अनुदान देते आणि दुसऱ्या बाजूला दूध संघ तीन रुपये दर कमी करते. दर कपात मागे घ्यावी अन्यथा आंदोलन करून मुंबई, पुण्याला जाणारे दूध बंद करू, असा इशारा विलास नाळे यांनी दिला आहे.

यावेळी 'गोकुळ'चे संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे यांच्यासह जोतिराम घोडके, सचिन शिंदे, पंडित पोवार, भिवाजी पोवार, महादेव चौगुले, बाबासाहेब माने, अमरसिंह रजपूत, सातू चव्हाण, सुरेश हांडे, ऋषीकेश पवार, पांडुरंग पाटील आदी पशुपालक उपस्थित होते.