शिरोली दुमाला मध्ये राहुल पाटील यांचे पारडे जड
शिरोली दुमाला (प्रतिनिधी) : शिरोली दुमाला (ता.करवीर) येथे नरके गटाला जोरदार हादरा बसला असून नरके समर्थक असणारे माजी महिला सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांचे पती,कुंभीचे संचालक किशोर पाटील यांच्या समर्थकांनी नरके गटाला रामराम ठोकून राहुल पी.पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे.याचबरोबर तुळशी सहकार समूहातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आम्ही काँग्रेससोबतच असल्याचे स्पष्ट केल्यामुळे शिरोली दुमाला गावात राहूल पाटील यांचेच पारडे जड असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुरुकली ता.करवीर येथील जाहीर प्रचार सभेमध्ये शिरोली दुमालातील समाधान पाटील आणि मच्छिंद्र कांबळे यांच्यासह त्यांच्या शेकडो नरके समर्थक सहकाऱ्यांनी राहूल पी.पाटील यांच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्ष प्रवेश केला.
मला ग्रामपंचायतला उमेदवारी देण्यासाठी विरोध झाला म्हणून जनतेने मला अपक्ष निवडून दिले.मी तुमच्या सोबत येणार नाही असे लक्षात आल्यावर उपसरपंच पदाचे आमिष दाखवून थांबवण्यासाठी प्रयत्न केले, पण तुमच्या लबाडीच्या राजकारणाला वैतागल्यामुळेच आम्ही स्वछ आणि निष्कलंक नेतृत्व असणाऱ्या राहूल पाटील यांना ताकद देण्याचा निर्णय घेतल्याचे समाधान पाटील यांनी सांगितले.
शिरोली दुमाला गावात दलित समाजाची मते मोठ्या प्रमाणावर असून आम्हीही काँग्रेसच्या झेंड्याखाली आल्यामुळे राहूल पी.पाटील यांना समाजातून मोठे मताधिक्य देणार असल्याचे माजी सरपंच रेखा कांबळे यांचे पती मच्छिंद्र कांबळे यांनी सांगितले.
तुळशी सहकार समूहातील पदाधिकारी काँग्रेससोबतच...
स्व.आमदार पी.एन.पाटील साहेबांसोबत तुळशी समूहाचे ३०-४० वर्षांपासूनचे नाते आहे. पण आमच्यातील काही लोकांनी चुकीचा निर्णय घेतला तो आम्हाला अजिबात मान्य नाही. तुळशी समूहातील बहुतांशी कार्यकर्ते हे काँग्रेससोबतच राहणार आणि राहुल पाटील यांना आमदार करणारच असा ठाम मनोदय नवनाथ पाटील यांनी शिरोली दुमालातील राहुल पाटील यांच्या भेटीप्रसंगी व्यक्त केला.
यावेळी माजी सरपंच पांडुरंग ना. पाटील, प्रा.के.एन. पाटील, तुळशी दूध संस्थेचे माजी चेअरमन पी.आर. पाटील, आनंदा पाटील, रघुनाथ पाटील, शिवाजी पाटील, अच्युत पाटील, विद्यमान संचालक बळवंत रा. पाटील, बाबुराव सुतार, बळीराम मर्दाने, मारुती कोठावळे, अशोक कौलवे, श्रीपती शेलार, बळवंत शेलार आदी उपस्थित होते.