गोकुळ दूध संघ जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याची मातृसंस्था - आ. सतेज पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) संघाशी सलग्न करवीर तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज बुधवार दि.०७ जुलै रोजी संकल्पसिद्धी मंगल कार्यालक पुईखडी, कोल्हापूर येथे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडली.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, गोकुळ दूध संघ ही संस्था कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याची मातृसंस्था असून गेल्या दोन अडीच वर्षात या संचालक मंडळाने माझ्या व मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काटकसरीचे, बचतीचे धोरण अवलंबले आहे. संघाच्या वार्षिक प्रक्रिया खर्च कमी करून दूध उत्पादक शेतकऱ्याना जादा मोबदला देण्यास आम्ही सर्वजन कठीबद्ध असून दूध उत्पादकांना सर्वाधिक सेवा सुविधा देणारा गोकुळ राज्यातील अग्रगण्य दूध संघ आहे असे मनोगत व्यक्त केले व पुढे म्हणाले दुधामध्ये संख्यांत्मक व गुणात्मक वाढ झाली. तरच दूध संस्था टिकणार आहेत. संकलनात १८ लाख ३१ हजार पर्यंत आपण पोहोचलो असून राज्यात उच्चांकी गोकुळने गाय दुधाला ३३ रुपये दर दिला आहे, याचा थोडा तोटा संघाला झाला आहे. भविष्यात म्हैस दूध संकलन वाढीसाठी सर्वांनी सहकार्य करावे व कार्यक्षेत्रातील बाहेर जाणारे दूध सर्वांच्या प्रयत्नातून गोकुळकडे वळवले पाहिजे व संकलित झालेले सर्व दूध संस्थांनी संघास पाठवावे असे आवाहन केले.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, राज्यात गोकुळने दूध उत्पादकांना सर्वाधिक गाय दूध अनुदान मिळवून दिले आहे. त्यामध्ये करवीर तालुका आघाडीवर असून करवीर तालुका सर्वच बाबतीत आघाडीवर आहे. त्याच पद्धतीने म्हैस दूध संकलन वाढीसाठी करवीर तालुक्याने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले व संघाने दूध उत्पादकांच्या जातिवंत जनावरांसाठी नवीन उत्पादित केलेले कोहिनूर डायमंड हे पशुखाद्य व आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी वापर करावा. विविध बचतीच्या माध्यमातून दूध उत्पादकां जास्तीत जास्त त्यांच्या कष्टाचा मोबदला देण्याचे काम गोकुळने केले असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले की, संघाचे गाय दूध संकलनात होत असलेली वाढ ही निश्चितच चिंताजनक आहे. तरी करवीर तालुक्यात संघाच्या विविध योजना तसेच स्व. आनंदराव पाटील - चुयेकर म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवून म्हैस दूध संकलन वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
या संपर्क सभेस दूध संस्था प्रतिनिधींनी शिवाजी देसाई (भामटे), सर्जेराव भोसले (सावर्डे), प्रविण पाटील (कावणे), के.डी. पाटील (खुपिरे), नारायण पाटील (भामटे) उपस्थित केलेल्या प्रश्नांना चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वास पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी यांनी समर्पक उत्तरे दिली.
याप्रसंगी पुर परिस्थितीत दूध संकलन सुरळीत ठेवणारे व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संघाच्या विस्तार सुपरवाझर, टेम्पो चालक तसेच बिद्री चिलिंग सेंटरचे शाखाप्रमुख विजय कदम यांचा सत्कार करण्यात आला. किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना विमा रक्कमेचे धनादेश वाटप करण्यात आले. संकलन, पशुसंवर्धन, वैरण विकास, पशुखाद्य, वित्त, मिल्कोटेस्टर, संगणक, गुणनियंत्रण या विभागावर सविस्तर चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले तसेच विविध सूचनाची नोंद घेण्यात आली.
यावेळी स्वागत संचालक बाबासाहेब चौगले व प्रस्ताविक संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांनी केले. संचालक बाळासाहेब खाडे यांनी मनोगत व्यक्त केले. तर आभार संचालक प्रकाश पाटील यांनी मानले