" गोकुळ"ला बेस्ट डेरी प्लांट पुरस्कार; मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान
कोल्हापूर ( प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) दिल्ली येथील इंडियन डेअरी असोसिएशन (वेस्ट झोन) या दुग्ध व्यवसायातील शिखर संस्थेमार्फत जाहीर झालेला महाराष्ट्रातील 'अतिउत्कृष्ट दुग्ध प्रकल्प' (बेस्ट डेअरी प्लांट) हा मानाचा पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे झालेल्या दुग्ध व्यवसायावरील राष्ट्रीय परिषदेत प्रदान करण्यात आला. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याच कार्यक्रमामध्ये गोकुळशी सलग्न असलेल्या मनाली सहकारी दूध संस्था, पेद्रेवाडी (आजरा) या संस्थेच्या महिला दूध उत्पादक सौ. लता उत्तम रेडेकर यांना 'बेस्ट वुमेन फार्मर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण प्रसंगी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, दुग्ध व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने दुधाचा उत्पादन खर्च कमी करून जनावरांची उत्पादकता वाढविल्याने दुग्ध व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो. याचे यशस्वी उदाहरण गोकुळ दूध संघ आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांचे मिळून दिवसाला ५ लाख लिटर पर्यंत संकलन आहे, त्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यातील एकट्या गोकुळचे दूध संकलन २० लाख लिटर पर्यंत आहे. हे कौतुकास्पद असून गोकुळमुळे पश्चिम महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यास मदत झाली आहे. गोकुळ सारखे दुग्ध व्यवसायातील भरीवकाम विदर्भ-मराठवाड्यात झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि गोकुळ परिवारातील सर्वांचेच पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी संघाचे चेअरमन अरूण डोंगळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गोकुळचा २०२३-२४ सालचा वार्षिक अहवाल दिला. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी अहवालाच्या मुखपृष्ठ संकल्पनेचे तसेच गोकुळच्या एकूणच कामगीरीचे भरभरून जाहीर कौतुक करून गोकुळ दूध प्रकल्पास भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ दूध संघास मिळालेला हा पुरस्कार म्हणजे दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, अधिकारी-कर्मचारी व सर्व संबधित घटक यांच्या कष्टाचा सन्मान आहे.या पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी इंडियन डेअरी असोसिएशन अध्यक्ष डॉ. आर. एस. सोधी, एन.डी.डी.बी. चेअरमन मिनेश शहा, महाराष्ट्र पशु व मत्यस विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, आय.डी.ए. (वेस्ट झोन)चे चेअरमन डॉ. प्रजापती, डॉ. पारेख, डॉ. प्रशांत वासनिक आदी प्रमुख मान्यवरासह महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, दिव दमन या राज्यातील दूध संघाचे प्रतिनिधी व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.