चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांची मदत घेऊन चित्रनगरीत आवश्यक सुविधांची निर्मिती करा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर चित्रनगरीतील भौतिक सुविधा निर्माण केल्या जात असताना यासाठी चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञ, जाणकारांशी विचार विनिमय करून, आवश्यक त्याच सुविधा निर्माण केल्या पाहिजेत अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. त्यांनी आमदार अमल महाडिक यांच्या समवेत कोल्हापूर येथील चित्रनगरी कामकाजाचा आढावा घेतला.
पालकमंत्री पुढे म्हणाले, शासनाकडून आवश्यक निधी दिला जात आहे त्यानुसार चित्र नगरीच्या विकासाच्या दृष्टीने विचार करून सध्या राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील चित्रपटसृष्टीला आवश्यक त्या सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे. यावेळी आमदार अमल महाडिक, चित्रनगरीचे प्रकल्प व्यवस्थापक दिलीप बांदिगरे उपस्थित होते.
जिल्ह्यातील या चांगल्या सुविधेचा चांगला वापर होऊन चांगला महसूल उभा राहील, जिल्ह्यात रोजगार निर्मिती होईल तसेच पर्यटनाला चालना मिळेल यासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे. मुंबई पुणे येथील चित्रपटसृष्टीत असणाऱ्या सुविधांपेक्षा कोल्हापुरात चांगल्या पद्धतीने सुविधा उभारण्याची संधी आहे. कोल्हापूर पासून समुद्र, घाट, जंगल इत्यादी परिसर जवळ असल्याकारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चित्रीकरण करण्यासाठी मागणी आहे.
यावेळी त्यांनी चित्रनगरी मधील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या सेटची पाहणी केली व सुरू असलेल्या कामकाजाचाही आढावा घेतला. कोल्हापूर चित्रनगरी ही महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरात स्थित एक प्रमुख चित्रपट निर्मिती केंद्र आहे. कोल्हापूरला एकेकाळी भारतीय चित्रपटसृष्टीचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जात होते. बाबूराव पेंटर यांच्यासारख्या दिग्गजांनी येथेच चित्रपट निर्मितीचा पाया रचला. गेल्या काही वर्षांत, राज्य सरकारने या चित्रनगरीच्या विकासाकडे लक्ष दिले असून यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे असे त्यांनी म्हटले.
आमदार अमल महाडिक यांनी या ठिकाणी सुरुवातीला जे जे उपलब्ध आहे त्या भौतिक सुविधांचा चांगल्या प्रकारे विकास करण्याचे नियोजन असल्याचे सांगून चित्रपट सृष्टीतील जाणकारांनी जी मागणी केली आहे त्या पद्धतीने नियोजित विकास कामांमध्ये समावेश केला जात असल्याचे सांगितले. पुढील तीन वर्ष ते दहा वर्षांपर्यंत चित्रनगरीतील विविध ठिकाणांचे बुकिंग झाले असल्याचे सांगून येत्या काळात जर नियोजनाप्रमाणे सर्व कामे झाली तर राज्यातील सर्वात उत्कृष्ट चित्रनगरी उभी राहू शकते असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. प्रकल्प व्यवस्थापक दिलीप बांदिगरे यांनी सुरू असलेल्या विविध कामकाजाची माहिती दिली.
कोल्हापूर चित्रनगरीत सध्या अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत आणि भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टुडिओ उभारण्याची योजना आहे. येथे विविध प्रकारची लोकेशन्स विकसित केली आहेत, ज्यात वाडा, चाळ, मंदिर, रेल्वे स्टेशन, शहरी आणि ग्रामीण वस्तीचे देखावे इत्यादींचा समावेश आहे. कलावंत आणि तंत्रज्ञांसाठी राहण्याची व्यवस्था, बगीचा, स्विमिंग पूल, हिरवळ, रस्त्यांवर चित्रीकरणासाठी अंडाकृती रस्ते आणि स्ट्रीट लाइट्स यासारख्या सुविधाही विकसित केल्या जात आहेत.
चित्रनगरीच्या विकासामुळे कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर संबंधित क्षेत्रांतील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे. कॅटरिंग, लॉजिंग, कपडे इस्त्री करणारे, नेपथ्य करणारे, कारपेंटर अशा अनेकांना यामुळे काम मिळाले आहे. चित्रनगरीच्या विकासामुळे सिनेमा टुरिझमलाही चालना मिळणार आहे.