महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा धोका,काँग्रेसचे ३-४ मतं फुटण्याची शक्यता

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा धोका,काँग्रेसचे ३-४ मतं फुटण्याची शक्यता

मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी आज (१२ जुलै) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात असल्यामुळे मतफुटीचा धोका आहे. कोण उमेदवार पराभूत होणार याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. क्रॉस व्होटिंगचा धोका लक्षात घेऊन बहुतेक पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे.

मतदान पसंतीक्रमानुसार कसे करायचे याची रणनीती गुरुवारी दिवसभर आखण्यात आली आणि शुक्रवारी मतदानपूर्वी याबाबत सूचना दिल्या गेल्या. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची तीन ते चार मतं फुटणार असल्याचे वक्तव्य केले होते. गोरंट्याल यांनी आजही त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले.गोरंट्याल यांनी विधान भवनाबाहेर काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यांनी सांगितले की, "मी केलेल्या वक्तव्याचा आमच्या पक्षाला फायदाच झाला आहे. मी काल (११ जुलै) काही आमदारांबाबत केवळ संशय व्यक्त केला, त्यानंतर आज त्यांच्यापैकी काहीजण पक्षाने बोलावलेल्या बैठकीला हजर झाले."मतदानाच्या निकालानंतर कोणाचे अंदाज खरे ठरतील आणि कोणते उमेदवार निवडून येतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.