तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच मिळणार गती - आ. अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि लोकप्रतिनिधींची बैठक संपन्न झाली. या बैठकीत राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या बास्केट ब्रिज आणि तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपूला संदर्भात विस्तृत चर्चा झाली. बास्केट ब्रिज वरून कोल्हापूर शहरात थेट प्रवेश मिळणार असल्यामुळे तावडे हॉटेल येथे होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. या बास्केट ब्रिजला जोडूनच तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या उड्डाणपुलाची उभारणी करावी अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी केली. तावडे हॉटेल ते शिवाजी पूल हा उड्डाणपूल इलेव्हेटेड पद्धतीने उभारण्यात येणार असून यासाठीचा तांत्रिक आराखडा या बैठकीत सादर करण्यात आला.
शहरात प्रवेश केल्यानंतर मार्केट यार्ड- कावळा नाका- मध्यवर्ती बस स्थानक- दसरा चौक अशा मार्गाने जाणाऱ्या या उड्डाणपुलाला सीपीआर चौकात वळवण्यात येणार आहे. करवीर पंचायत समितीला वळसा घालून स्मशानभूमीच्या बाजूने शिवाजी पुलाकडे रत्नागिरी राज्य मार्गाला तसेच पंचगंगा नदी घाटाच्या बाजूने लक्षतीर्थ वसाहत मार्गे गगनबावडा राज्य मार्गाला हा उड्डाणपूल जोडण्यात येणार आहे. याच उड्डाणपुलाला मध्यवर्ती बस स्थानकापासून रेल्वे ओव्हर ब्रिज करून पाच बंगला परिसराशी जोडण्यात यावे अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी केली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत हा मार्ग येत नसला तरी खास बाब म्हणून आम्ही सर्व लोकप्रतिनिधी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देऊ अशी ग्वाही यावेळी सर्वांनी दिली. हा उड्डाणपूल झाल्यास परीख पूलाजवळ होणारी वाहतूक कोंडी कमी होईल असे मत आमदार महाडिक यांनी व्यक्त केले. या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामासाठी कन्सल्टंट कंपनीची निवड महापालिका प्रशासनाने करावी त्या कंपनीचे मानधन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दिले जाईल असे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले. लवकरच यासंबंधी निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि आमदार महाडिक यांनी दिल्या.
प्रस्तावित उड्डाण पुलामध्ये बाधित होणाऱ्या सेवावाहिन्या स्थलांतरित करण्यासंदर्भात सल्लागार नेमण्यासाठी वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे. संबंधित सल्लागाराची तातडीने नेमणूक करून अहवाल सादर करावा अशा सूचना आमदार महाडिक यांनी केल्या. त्याचबरोबर टेंबलाईवाडी येथील रेल्वे उड्डाणपूल पाडून विस्तारित उड्डाणपूल बांधण्यासंदर्भात पाहणी करण्याच्या सूचना आमदार महाडिक यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
हॉटेल सयाजी च्या दारातून सुरू होणारा हा उड्डाणपूल शासकीय तंत्रनिकेतन शिवाजी विद्यापीठ चौकापर्यंत न्यावा असे मत महाडिक यांनी व्यक्त केले. यामुळे टेंबलाईवाडी चौकात होणारी वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल असेही ते म्हणाले. यावर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी संरक्षण विभागाच्या परवानगीचा मुद्दा मांडला. या विषयावर 10 जून रोजी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन आमदार अमल महाडिक यांनी दिले.
शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी उड्डाणपूलांची संख्या वाढवली पाहिजे. त्याचबरोबर भुयारी मार्गांचे नियोजन केले पाहिजे अशा सूचनाही आमदार महाडिक यांनी केल्या.
या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.