कागल व मुरगुड ग्रामीण रुग्णालयांची बेड क्षमता वाढवण्यासाठी नामदार मुश्रीफ यांची नामदार आबिटकरांकडे मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी: कागल व मुरगुड येथील ग्रामीण आरोग्य केंद्रांची बेड क्षमता ३० वरून ५० बेड इतकी वाढवा, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे. या दोन्हीही दवाखान्यांमध्ये नवीन विभागांसह डायलिसिस सेंटरही अत्यावश्यक असल्याने तेही सुरू करा, अशी मागणीही मंत्री मुश्रीफ यांनी केली आहे.
यासंदर्भात मंत्री मुश्रीफ यांनी आरोग्यमंत्री आबिटकर यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कागलमध्ये असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाचा उपयोग कागल परिसरातील खेडोपाड्यातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात होतो. तसेच; हे ग्रामीण रुग्णालय कागल- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गालगतच असल्यामुळे अपघातातील जखमीनाही या दवाखान्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. मुरगुड ग्रामीण रुग्णालयाचा उपयोग मुरगुड परिसरातील ३५ ते ४० गावांना होतो. मुरगुडपासून सेनापती कापशी माद्याळपर्यंतच्या डोंगराळ भागातील ग्रामस्थांसाठी हे आरोग्य केंद्र महत्त्वाचे आहे.