धक्कादायक..! विषारी दारू पिल्याने 32 जणांचा मृत्यू, 60 जणांवर उपचार सुरू
चेन्नई - तामिळनाडूच्या कल्लाकुरुची जिल्ह्यामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. विषारी दारू प्यायल्यामुळे २५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ६० जणांना रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
कल्लीकुरुचीचे जिल्हाधिकारी एमएस प्रसंथ यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे. रुग्णांना जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी यासंदर्भात दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, 'मला ही माहिती कळाल्याने धक्का बसलाय आणि माझं मन दु:खी झालं आहे. विषारी दारु पिल्याने कल्लाकुरुची येथे अनेकांचा मृत्यू झाला. याप्रकरणात दोषी असणाऱ्यांना अटक करून कठोर कारवाई करण्यात येईल. याशिवाय याप्रकरणी निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होईल.'
स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची घोषणा केली आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. याशिवाय याप्रकरणी चोकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून समितीला तीन महिन्यात रिपोर्ट सादर करायचा आहे.
दुर्घटनेसाठी कारणीभूत असलेल्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारचे गुन्हे समाजाला उद्ध्वस्त करत असतात, असं देखील स्टॅलिन म्हणाले.