निवडणुकांआधीच्या लाडक्या बहिणी आता सावत्र का झाल्या :आमदार सतेज पाटील यांचा सवाल

निवडणुकांआधीच्या लाडक्या बहिणी आता सावत्र का झाल्या :आमदार सतेज पाटील यांचा सवाल

कोल्हापूर प्रतिनिधी : लाडकी बहीण योजनेच्या निकषाची जबाबदारी पहिल्यापासून जिल्हाधिकाऱ्यांवर होती तर आता पात्र महिलांना अपात्र करुन त्यांची फसवणूक का केली जात आहे ? निवडणुकांआधीच्या लाडक्या बहिणी आता सावत्र का झाल्या ? असा सवाल काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी केली.  

      सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून आमदार पाटील यांनी विधानपरिषदेत लाडक्या बहिणींच्या अपात्रतेबाबत प्रश्न उपस्थित केला. 

आ. सतेज पाटील म्हणाले, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करताना ग्रामसेवक किंवा स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेऊनच लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी केली. त्यामुळे राज्य सरकारने या महिलांना अपात्र करू नये. विधानसभा निवडणुकांआधी पुढील दोन महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पाठवले. महाराष्ट्रात अशी कोणतीही योजना नाही ज्यामध्ये पुढच्या महिन्याचे अनुदान सरकार या महिन्यात देते. महायुतीने सरकारकडे एवढी ताकत आहे तर पुढल्या एक वर्षाचे अनुदान महिलांच्या खात्यावर जमा करावे असे आव्हानही त्यांनी दिले.  

 

२१०० रुपये कधी देणार 

  महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितल्या प्रमाणे २१०० रुपयांची तारीख अजूनही सरकारकडून जाहीर केली जात नसल्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले. ज्या लाडक्या बहिणींना अपात्र केले त्यांना सरकार परत पात्र करून घेणार आहे का ? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.