नौदलाच्या बोट चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

नौदलाच्या बोट चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

मुंबई : मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटा घारापुरीला निघालेल्या नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने बुधवारी (18 डिसेंबर) रोजी जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात प्रवासी बोट समुद्रात बुडाली आणि तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात वाचलेले नाथाराम चौधरी (वय 22) यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 106 (1), 125 (अ) (ब), 282, 324 (3) (5) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निष्काळजीपणामुळे 13 जणांच्या मृत्यूला कारभूत ठरल्याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नौदल, तटरक्षक दल व मुंबई पोलिसांनी राबवलेल्या बचाव कार्यात 115 जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, अद्याप दोघे बेपत्ता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

नौदल स्पीड बोटीच्या इंजिनाची चाचणी करीत असताना अरबी समुद्रात उरण करंजाजवळ दुपारच्या सुमारास नौदलाच्या बोटीचे नियंत्रण सुटले आणि ती करंजा येथे नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला धडकली. या दुर्घटनेत 1 नौदल कर्मचारी, नौदलाचे दोन अधिकारी यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. 99 जणांना वाचवण्यात यश आले आहे. नीलकमल ही प्रवासी बोट प्रवाशांना घेऊन घारापुरीकडे जात होती. दुपारी 3.55 वाजता नौदलाच्या एका स्पीड बोटीने प्रवासी बोटीला उजव्या बाजूने जोरदा धडक दिली.

13 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर 

धडकेनंतर नीलकमल बोट कलंडली आणि बुडू लागली. दोन्ही बोटींवर प्रवासी आणि कर्मचारी असे एकूण 115 जणांना बचाव कार्यात वाचवण्यात आले. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. 97 जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. जखमींपैकी जेएनपीटी रुग्णालयात 75, नेव्हल डॉकयार्डमध्ये 25, अश्विनी रुग्णालयात एक, सेंट जॉर्जमध्ये नऊ, करंजे येथे 12, तर मोरा रुग्णालयात 10 जणांना दाखल करण्यात आले आहे.