पदवीधर विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासोबत बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्णसंधी..!

पदवीधर विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासोबत बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्णसंधी..!

कोल्हापूर : पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. कारण आता पदवीधर विद्यार्थ्यांना आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता करता बीएडचा अभ्यासक्रम  पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यातील महाविद्यालयांमध्ये या वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अर्थात एनईपी लागू झाले असल्याने  राज्यातील जी महाविद्यालये सामंजस्य करार करतील त्या महाविद्यालयांत बीए बीएड, बीकॉम बीएड, बीएस्सी बीएड या नवीन अभ्यासक्रमाला सुरुवात होणार आहे. कॉलेजेसने सामंजस्य करार केल्यास जून 2025 पासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

राज्यात सिंगल फॅकल्टी महाविद्यालयांची संख्याही अधिक असल्याने त्या परिसरातील इतर महाविद्यालयांशी सामंजस्य करार करून, विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देता येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थी इतर शाखेतील कोर्स पूर्ण करू शकतील. हा विद्यार्थ्यांचा हक्क असून, महाविद्यालयांनी तो पूर्ण करून देणे बंधनकारक आहे.

एनईपीमुळे आपण सरप्लस होऊ अशी प्राध्यापकांच्या मनात भीती आहे; पण तसे होणार नाही. याउलट प्राध्यापकांचा कार्यभार वाढणार आहे. प्राध्यापकांना संशोधन करण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनजॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप बाबत प्रश्न पडत आहेत. अशा विद्यार्थ्यांनी शहरी भागातच इंटर्नशिप करावी, असे नाही. ग्रामीण भागातील पतसंस्था, भाजी मार्केट, रुग्णालये, वृत्तपत्रांची कार्यालये या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग घेता येणार आहे. याच प्रकारे विज्ञान शाखेतील विद्यार्थी लॅण्ड टेस्टिंग, शेतीच्या संदर्भातील कामांमध्ये मदत करू शकतात. स्कूल कनेक्ट उपक्रमातून एनइपीतील मल्टी डिसिप्लिनरी, क्रेडिट कसे मोजावे, याची माहिती वेळोवेळी महाविद्यालयातून देण्यात येणार आहे.