पश्चिम महाराष्ट्रात अंमली पदार्थांच्या तस्करीत वाढ झाल्याबद्दलचा प्रश्न आम. सतेज पाटील यांनी अधिवेशनात केला उपस्थित

पश्चिम महाराष्ट्रात अंमली पदार्थांच्या तस्करीत वाढ झाल्याबद्दलचा प्रश्न आम. सतेज पाटील यांनी अधिवेशनात केला उपस्थित

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात अंमली पदार्थांची साठवण आणि तस्करी होत असून नशेच्या आहारी गेलेल्या शेकडो तरुणांच्या आयुष्याचे नुकसान होत आहे. याबाबत अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून कोणती कारवाई केली जात आहे, तसेच तरुणांना अंमली पदार्थांच्या सेवनापासून रोखण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत असा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला आहे.

        आमदार सतेज पाटील यांनी, पश्चिम महाराष्ट्रात विशेषता कोल्हापूर आणि सांगलीमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये वाढ झाल्याबाबतचा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला. कोल्हापूर सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात मेकेड्रॉन, कोकेन, चरस आणि गांजा अशा अंमली पदार्थांची साठवण आणि तस्करी होत असून कल्चरच्या नावाने तरुण वर्ग नशेच्या आहारी गेला आहे. अंमली पदार्थांमुळे नशेच्या आहारी गेलेल्या शेकडो तरुणांच्या आयुष्याचे नुकसान होत असल्याकडे आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधले. सांगली जिल्ह्यातील विटा शहराजवळ असलेल्या कार्वे औद्योगिक वसाहतीत मेकेड्रॉन, एमडी ड्रज तयार करणाऱ्या कारखान्यावर गेल्या 27 जानेवारीला गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकून 29 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. अंमली पदार्थामुळे तरुणांमध्ये गुन्हेगारीची प्रवृत्ती प्रवृत्ती वाढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी चौकशी केली आहे का? चौकशीच्या अनुषंगाने अंमली पदार्थाची साठवण, विक्री, पुरवठा आणि तस्करी करणाऱ्या विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून (नार्कोटिक्स) कोणती कारवाई केली आहे. तसेच तरुणांना अंमली पदार्थांच्या सेवनापासून रोखण्याच्या दृष्टीने कोणती कारवाई आणि उपाययोजना करण्यात येत आहेत असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला.

      यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्याविरुद्ध एनडीपीएस कायदा 1985 अन्वये कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले. कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात अंमली पदार्थ विरोधी कक्ष, स्थानिक पोलीस ठाणे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखा यांच्यामार्फत अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. राज्यात 2024 मध्ये अंमली पदार्थ कायद्यातर्गत सेवनार्थींच्या विरुद्ध 15873 गुन्हे दाखल करण्यात आले असून 14230 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच अंमली पदार्थ जवळ बाळगणे, त्याची वाहतूक करणे या संदर्भात एकूण 2738 गुन्हे दाखल झाले असून 3727 आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.