पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त "गीत अहिल्यायण" या कार्यक्रमाचे आयोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त "गीत अहिल्यायण" या कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती 31 मे रोजी साऱ्या देशभर उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती यावर्षीची त्रिशताब्दी जयंती आहे. या त्रिशताब्दी जयंती निमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीनेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवार 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी लिहिलेल्या " गीत अहिल्यायण " या महाकाव्याचे  सादरीकरण करण्यात येत असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस व अहिल्यादेवी जयंती समारोहाचे जिल्हा संयोजक शिवाजी बुवा यांनी दिली. 

अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन चरित्र "गीत अहिल्यायण " या महाकाव्याच्या रूपाने  माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी लिहिले आहे. या महाकाव्याला कोल्हापुरातील आघाडीचे संगीतकार शिवराज पाटील यांनी संगीतबद्ध केले आहे. त्याची ध्वनीफीत झाली असून यामध्ये महाराष्ट्राचे आघाडीचे गायक पंडित रघुनंदन पणशीकर,स्वप्निल बांदोडकर,शकुंतला जाधव,माधुरी करमरकर, देवकी पंडित यांनी ती गायली आहे तर या ध्वनिफितीचे निवेदन तत्कालीन आयुक्त इंद्रजीत देशमुख यांनी केले आहे. 

अतिशय सुश्राव्य अशा या महाकाव्याची निर्मिती शिवगंधार संगीत संस्था कोल्हापूर यांनी केली असून याच महाकाव्याचे सादरीकरण अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी म्हणजे शनिवार 31 मे रोजी दुपारी 3 वाजता राम गणेश गडकरी सभाग्रह पद्माराजे हायस्कूल कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे. 

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक, आ. शिवाजीराव पाटील, माजी आ. सुरेशराव हळवणकर , माजी मंत्री भरमू सुबराव पाटील , माजी आ. संजय बाबा घाटगे , महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सचिव महेश जाधव , भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव  यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.