मदरसा बंद व्हावा म्हणून ११ वर्षाच्या मुलानं केलं असं भयंकर कृत्य ; नेमकं काय घडलंं

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील निजामिया मदरशामध्ये शिकणाऱ्या ११ वर्षीय फैजान नजिम या विद्यार्थ्याचा खून एका अन्य अल्पवयीन मित्राने केला असल्याची माहिती समोर आली आहे. अधिक सुट्टी मिळावी आणि मदरसा बंद व्हावा, या हेतूने हा खून केल्याची कबुली संशयिताने दिली आहे.
ही घटना रविवारी रात्री घडली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत, फैजानच्या तोंडात कापड कोंबून आणि विजेच्या शॉकने त्याचा जीव घेतल्याचं तपासात निष्पन्न झालं. सोमवारी पहाटे पाच वाजता फैजानचा मृतदेह आढळून आला, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशीच्या आधारे पोलिसांनी त्या मदरशातीलच दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं. सुरुवातीला तो घाबरून काही बोलत नव्हता, त्यामुळे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बालकल्याण समिती सदस्य व मानसोपचार तज्ञांच्या मदतीने त्याच्याशी संवाद साधण्यात आला. त्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दोघांचा तपास पोलीस पथक सुरू आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी घटनास्थळी भेट देत तपास अधिक खोलात घेण्याचे आदेश दिले आहेत. खून करण्यात वापरलेली वायर कुठून आणली आणि ती कुठे लपवली याचा शोधही सुरु आहे.
ही घटना समोर आल्यानंतर मदरशांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धार्मिक शिक्षण संस्थांमध्ये मुलांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या मानसिकतेवर होणारे परिणाम यावर नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.