मनोज जरांगे यांचा ९ ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौरा
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलै रोजी सुरू केलेलं आपलं उपोषण स्थगित केलंय. आता ते आगामी रणनीती आखण्यासाठी शांतता रॅली सुरू करणारयेत. ते पुन्हा एकदा 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत.
सात दिवसांत सात जिल्ह्यांचा ते दौरा करणारयेत. या दौऱ्यासाठी सकल मराठा समाजाकडून तयारी सुरूय. जरांगे पाटील हे सात ऑगस्ट रोजी सोलापूर इथं शांतता रॅली काढणार असून मुक्काम सोलापुरात असणारय. त्यानंतर 8 ऑगस्ट रोजी सांगली, 9 ऑगस्ट रोजी कोल्हापूर, 10 ऑगस्ट रोजी सातारा जिल्हा, 11 ऑगस्ट रोजी पुणे, 12 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर आणि 13 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात या शांतता यात्रेचा समारोप होणारय. ‘सांगावा आलाय पाटलांचा , पुढील मोहिमेचा...’ अशा पद्धतीनं सोशल मीडियावर हा मेसेज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात फिरू लागलाय. लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांच्या निरोपानं महायुतीमधील अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला होता. आता विधानसभेपूर्वी जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यानं अनेक आमदारांचे टेन्शन वाढणाराय असं चित्र दिसून येतंय.