महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वसमावेशक करा- आ. सतेज पाटील

महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वसमावेशक करा- आ. सतेज पाटील

कोल्हापूर( प्रतिनिधी) महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वसमावेशक करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत केली. खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयात देखील या योजने अंतर्गत उपचार करण्यात यावेत. याशिवाय किडनीसह इतर खर्चिक उपचारासाठी, जादा रक्कमेची तरतुद करण्याची मागणीही विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. 

 महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये काही आजारांसाठी केवळ सरकारी रुग्णालयामध्ये करण्यात येणाऱ्या उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे इतर खासगी अथवा धर्मादाय रुग्णालयांमध्ये करण्यात येणारे उपचार या योजनेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी आज विधानपरिषदेत केली.

या योजनेमध्ये समाविष्ट काही उपचार महागडे आहेत. किडनीवरील उपचारासाठी सुमारे वीस ते पंचवीस लाख रुपयांचा खर्च येतो. अशा उपचारांसाठी निर्धारीत करण्यात आलेल्या मंजूर रकमेमध्ये वाढ करण्यात यावी. तसेच या योजनेमध्ये ज्या रुग्णालयांचा समावेश नाही. त्यांचा समावेश करण्यासंदर्भातील धोरण सरकारन निश्चित करावे. अशी मागणीही त्यांनी केली. 

आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न मांडल्या नंतर त्याला उत्तर देताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी, या योजनेमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये होत असणाऱ्या उपचारांचा समावेश इतर खासगी अथवा धर्मादाय रुग्णालयामध्ये मध्ये करण्याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमून आठ दिवसात अहवाल घेऊ. तसेच सरकारी रुग्णालयांसह इतर रुग्णालयांमध्ये घेण्यात येणाऱ्या उपचारांचा समावेश करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यावेळी दिले.