उद्योजकांच्या अडचणी प्राधान्याने सोडवू : राहुल भिंगारे

उद्योजकांच्या अडचणी प्राधान्याने सोडवू : राहुल भिंगारे

कोल्हापूर (प्रतिनिधि) : जिल्हात नव्याने साहुवाडी, पन्हाळा, राधानगरी येथे औद्योगिक उसाहती निर्माण होणार असून, यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र विस्तारणार आहे. उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळ प्राधान्याने काम करेल, अशी ग्वाही औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे यांनी गुरुवारी दिली.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा ६२वा वर्धापन दिन हॉटेल पैोलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी कार्यकारी अभियंता आर. ए. नाईक, शिरोली मैन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, गोशिमाचे अध्यक्ष नितीन दलवाई, 'मॅक'चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, दीपक चोरगे, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे सचिव प्रसन्न तारदाळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

भिंगारे म्हणाले, जिल्ह्यातील उद्योजकांना उद्योग व्यवसायात ज्या अडचणी येतील त्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे बीएमआयसी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. यामध्ये ३२०० हेक्टर क्षेत्र भूसंपादन करणार असून संरक्षण, इलेक्ट्रॉनिक, अन्नप्रक्रिया यासारख्या उद्योगांचे हब तयार होईल. शिरोळ, राधानगरीतील कौलव व सातारा जिल्ह्यात शिरवळ येथे औद्योगिक वसाहतीसाठी दोन हजार हेक्टर क्षेत्र भूसंपादनाच्या अंतिम टप्प्यात आहे. शाहूवाडी येथे पन्हाळा औद्योगिक क्षेत्र म्हणून प्रस्तावित करणार आहे. त्याचे भूसंपादन गतीने करण्याचा प्रयत्न आहे. यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेपासूनचा आढावा घेतला. 

यावेळी अजय कुरणे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील अपराध यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला उपभियंता अजयकुमार रानगे, मोहन कुशिरे, स्वागत कदम उपस्थित होते.