म्हैस दूध संकलन वाढीसाठी गोकुळच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविणार - नविद मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) संघाचे वरिष्ठ अधिकारी, दूध संकलन विभागाचे अधिकारी व सुपरवायझर यांची तालुकानिहाय आढावा मिटिंग चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली गोकुळच्या ताराबाई पार्क, कार्यालय येथे संपन्न झाली. या मिटिंगमध्ये दुग्ध व्यवसायातील आधुनिक संकल्पना, म्हैस दूध संकलन वाढीसाठी संधी गोकुळच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवणार असल्याचे प्रतिपादन चेअरमन नविद मुश्रीफ यांनी यावेळी केले.
गोकुळच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल नविद मुश्रीफ यांचा संघाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
चेअरमन नविद मुश्रीफ पुढे म्हणाले, गोकुळ दूध संघ हा म्हैस दुधासाठी राज्यभर ओळखला जातो. म्हैस दुधाची बाजारपेठ अधिक व्यापक असून दुधाची मागणी जास्त आहे. त्यामुळे म्हैस दुधाचे संकलन वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी गोकुळच्या जातीवंत म्हैस खरेदी अनुदान योजना तसेच दूध उत्पादकांसाठी असलेल्या गोकुळच्या विविध योजना भविष्यात अधिक प्रभावीपणे राबविणार असून जिल्ह्यातील व सीमा भागातील जास्तीत जास्त दूध गोकुळकडे संकलित होण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. ज्यामुळे भविष्यात वीस लाख लिटर्स दूध संकलनाचे उदिष्ट साध्य होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दुग्ध व्यवसायात टिकून राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जनावरांचे उत्तम व्यवस्थापन, आहार नियोजन व दर्जेदार पशुखाद्याचा वापर महत्वाचा आहे. तसेच संघाच्या विविध योजना, फर्टीमीन प्लस या मिनरल मिक्स्चरचा व महालक्ष्मी पशुखाद्याचा नियमित वापर, आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब दूध उत्पादकांनी जास्तीत जास्त करावा यासाठी संकलन व पशुसंवर्धन, पशुखाद्य विभागामार्फत दूध उत्पादकांचे प्रबोधन करावे असे आवाहनही नविद मुश्रीफ यांनी केले.
या मिटिंगमध्ये दूध संकलनातील घट वाढ, कार्यक्षेत्रातील व बाहेरील दूध संकलन वाढीसाठी विविध उपायोजना, दुधाची गुणवत्ता, पशुसंवर्धन विभाग, पशुखाद्य विभाग, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रबोधन, संघाच्या विविध योजनांची अंमलबजावणीची गती वाढवणे या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी गोकुळचे माजी चेअरमन, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी यांनी संकलन विभागाच्या सर्व अडचणी व संधी यांचा आढावा घेत उपाययोजना सुचविल्या. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक डॉ.एम.पी.पाटील यांनी केले तर आभार संचालक किसन चौगले यांनी मानले.
यावेळी संघाचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, संचालिका अंजना रेडेकर, संघाचे अधिकारी अनिल चौधरी, अरविंद जोशी, शरद तुरंबेकर, डॉ. प्रकाश साळुंके, व्ही.डी.पाटील, दत्तात्रय वाघरे संघाचे अधिकारी व सुपरवायझर, कर्मचारी उपस्थि
त होते.