रस्ता सुरक्षा अभियान 2025: जनजागृतीला कोल्हापुरी शैलीतून संदेश
कोल्हापूर प्रतिनिधी : रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, रोट्रॅक क्लब आणि ड्रिम टीम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय व कावळा नाका येथे जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाने कोल्हापूरकर नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सकारात्मक संदेश पोहोचविला.
गुलाबपुष्प व अॅड्डुचे फूलद्वारे जनजागृती
वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. हेल्मेट परिधान करणे, सीटबेल्टचा वापर करणे अशा चांगल्या सवयी जोपासणाऱ्या वाहनधारकांना विशेष कौतुक मिळाले.
तर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना गांधीगिरीच्या माध्यमातून अॅड्डुचे फूल देऊन रस्ता सुरक्षा विषयाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कोल्हापुरी शैलीतून संदेश
उपक्रमातील सर्व स्वयंसेवकांनी हातात फलक घेऊन कोल्हापूरी भाषेतून खास संदेश दिले. नागरिकांनी या संदेशांना भरभरून प्रतिसाद दिला. काही ठळक संदेश होते:
"हेल्मेट पेक्षा डोस्क लय महाग हाय?"
"हेल्मेट फुटलतर दुसरं घिशील, डोस्क फुटलतर कुटं आणणार?"
"थांब कि भावा, पडू देकी सिग्नल हिरवा!"
यावेळी वाहनधारकांना रस्ता सुरक्षेबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले. हेल्मेट आणि सीटबेल्टचे महत्त्व, सिग्नलचे पालन, तसेच वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर न करणे याबाबत जनजागृती करण्यात आली.
"नियम पाळा, सुरक्षित राहा!" असा संदेश या अभियानातून पुन्हा एकदा कोल्हापूरकरांना देण्यात आला.