कोल्हापूर शहरातील उद्याने खाजगी कंपन्यांच्या सीएसआर मधून सुशोभित करण्यासह विविध विषयांवर आमदार अमल महाडिक यांची आयुक्तांसोबत चर्चा

कोल्हापूर शहरातील उद्याने खाजगी कंपन्यांच्या सीएसआर मधून सुशोभित करण्यासह विविध विषयांवर आमदार अमल महाडिक यांची आयुक्तांसोबत चर्चा

कोल्हापूर प्रतिनिधी: शहरातील विविध विषयांसंदर्भात आमदार अमल महाडिक यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांची भेट घेतली. यावेळी कोल्हापूर शहरातील बंद सिग्नल यंत्रणेबाबत आमदार महाडिक यांनी विचारणा केली. यावर उत्तर देताना शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी नादुरुस्त सिग्नलच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून शहर वाहतूक शाखेसोबत समन्वय ठेवण्यात येत आहे असे सांगितले.

शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना महाडिक यांनी दिल्या. इंदोर शहरातील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा अभ्यास दौरा करण्याचा सल्लाही महाडिक यांनी दिला. त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने नवीन जागेची पाहणी करून शासनाकडे कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करावा आपण यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली.

त्याचबरोबर नवीन 30 घंटागाड्या आणि एलईडी स्ट्रीट लाईट खरेदीसाठीही प्रस्ताव सादर करण्याची सूचना महाडिक यांनी केली. शहरातील प्रमुख उद्यानांच्या सुशोभीकरणासाठी एमआयडीसी मधील मोठ्या कंपन्यांकडे सीएसआर फंड ची मागणी करावी. या सी एस आर फंड मधून उद्यानांमध्ये सुधारणा तसेच देखभाली साठी खर्च करावा. आपण स्वतः कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊ असेही आमदार महाडिक यांनी नमूद केले. कोल्हापूर शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचाही आढावा आमदार महाडिक यांनी घेतला.

शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त झालेच पाहिजेत याचा पुनरुच्चार महाडिक यांनी केला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या जरग नगर आणि विक्रमनगर या दोन शाळा दत्तक घेण्याचा मानस आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला. महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे, डिजिटल क्लासरूम ची उपलब्धता करणे यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. केएमटीकडील चालू अवस्थेत असलेल्या बसेसची माहिती घेत त्यांनी लवकरच कोल्हापूर शहराच्या रस्त्यांवर ई बसेस धावतील असा विश्वास व्यक्त केला.

रंकाळा प्रदूषण आणि पंचगंगा प्रदूषण मुक्तीच्या अनुषंगाने कृती आराखडा तयार करून शासनाकडे सादर करावा. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.शहरातील रस्त्यांसाठी नगरोत्थानमधून अतिरिक्त निधी आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही महाडिक म्हणाले. शहरातील क्रीडांगणाची अवस्था, आरक्षित जागा, केशवराव भोसले नाट्यगृह आणि मैल खड्डा येथील प्रस्तावित नवीन प्रशासकीय इमारत या संदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. 

या बैठकीला शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.