रस्त्यांच्या कामाची गती वाढवा, कामे दर्जेदार करा : आमदार जयश्री जाधव

रस्त्यांच्या कामाची गती वाढवा, कामे दर्जेदार करा : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य सरकारकडून मिळालेल्या १०० कोटी निधीतील प्रमुख पाच रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करा, तसेच सर्वच रस्त्यांच्या कामाची गती वाढवा, कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करा आणि वेळेत पूर्ण करा अशा सूचना आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केल्या.

आमदार जयश्री जाधव यांनी माऊली चौक ते गोखले कॉलेज येथील रस्त्याच्या कामाची पाहणी महापालिकेचे अधिकारी व ठेकेदार कंपनीचे कर्मचारी यांच्यासह केली. यावेळी त्या बोलत होत्या.

आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, राज्य सरकारकडून मिळालेल्या १०० कोटी निधीतील रस्त्यांची कामे अत्याधुनिक यांत्रिकरणाच्या साह्याने टिकाऊ, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होणे गरजेचे आहे. या रस्त्यापैकी प्रमुख पाच रस्ते पावसाळ्यापूर्वी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यापैकी चार रस्त्याची काम अशंतः अपूर्ण आहेत ती कामे त्वरित पूर्ण करावीत. तसेच माऊली चौक ते गोखले कॉलेज येथील रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून, पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच या निधीतील उर्वरीत अकरा रस्त्यांची कामे बारचार्ट तयार करून, त्याप्रमाणे वेळेत पूर्ण करावीत.

यावेळी महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, उपशहर अभियंता आर. के. पाटील, कन्सल्टंट प्रोजेक्ट मॅनेजर अविनाश कसबेकर, ठेकेदार कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर शिवानंद आमने यांच्यासहभागातील नागरिक व महानगपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.