राजाराम कारखान्याच्या बॉयलरला भीषण आग

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलरमध्ये भीषण आग लागल्याची माहिती सध्या समोर येत आहे. ही आग विझवण्यासाठी कोल्हापूर शहरातील सर्व अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
टर्बाईन पेटल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे. ऊस गळीत हंगाम सुरु असतानाच ही आग लागल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी राजाराम कारखान्यात आग लागल्याचे समजताच कारखानास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली आहे. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. आग विझवण्यासाठी कोल्हापूर शहरातील सर्व अग्नीशमन दलाच्या गाड्यांना बोलावण्यात आलं आहे.आगीच्या धुराचे लोट सर्वदूर पसरल्याचे दिसून येत आहे.
कारखान्यावर महाडीक गटाची सत्ता
राजाराम कारखान्यावर सध्या महाडिक गटाची सत्ता आहे. कोल्हापूर दक्षिणचे भाजप आमदार अमल महाडिक या कारखान्याच्या अध्यक्षपदी आहेत.पाटील - महाडीक यांच्यातील राजकीय संघर्षामुळे हा कारखाना नेहमीच चर्चेत राहिला आहे. सभासद अपात्रतेच्या मुद्यावरून दोन्ही गटात मोठा संघर्ष झाला होता. अजूनही हे प्रकरण न्यायालयात आहे.
आगीबाबत काय म्हणाले अमल महाडीक ?
कारखान्याचा सीजन संपल्यानंतर डिसमेंटिंगच काम चालतं.काम चालू असताना कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की अचानक पेट धरली आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे लक्षात आले नाही. आग लागल्याचे लक्षात येताच आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले असुन अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे,असे कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडीक यांनी सांगितले. या दुर्घटनेत कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झाली नसल्याचेही अमल महाडीक यांनी यावेळी स्पष्ट केले.