राष्ट्रवादी कडून व्ही. बी. पाटील लढवणार लोकसभा निवडणूक

राष्ट्रवादी कडून व्ही. बी. पाटील लढवणार लोकसभा निवडणूक

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी 


कोल्हापूर जिल्हयाच्या विकासासाठी आगामी लोकसभा निवडणूक कोल्हापूर मतदारसंघातून लढविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी केली.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी (३१ जुलै) झाली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत जिल्हाध्यक्ष व्ही. बी. यांनी, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. ‘सत्तेचा पुरेपूर उपभोग घ्यायचा, भ्रष्टाचार करायचा आणि तो भ्रष्टाचार लपविण्यासाठी प्रसंगी बापाला बाजूला करुन उडी मारायची अशा प्रवृत्तीविरोधात आपण साऱ्यांनी लढायचे आहे. कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचारसरणीचा आहे, तो कदापि भारतीय जनता पक्षाला स्वीकारणार नाही’असे पाटील यांनी स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांसमोर बोलताना व्ही. बी. पाटील म्हणाले, “भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे पाच वर्षे मंत्री आहेत, मात्र त्यांनी कोल्हापूरचा काय विकास साधला ? त्यांना पुण्याला जाऊन विधानसभा निवडणूक लढवावी लागली. आता काही मंडळी त्यांच्यासोबत आहेत. मात्र त्यांना कोल्हापूरची जनता स्वीकारणार नाही.”

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी मंत्री मुश्रीफ यांचे नाव न घेता टीका केली. पोवार म्हणाले, ‘राष्ट्रवादी पक्षासाठी आम्ही संघर्ष केला, रस्त्यावरची लढाई केली. पण सत्तेची सर्व पदे कागलला दिली. नेत्यांनी कानात सांगणाऱ्यांचे ऐकल्यानेच पक्ष वाढीस मर्यादा आल्या.” याप्रसंगी निरंजन कदम, नितीन पाटील यांची भाषणे झाली. यापूर्वीच्या जिल्हाध्यक्षांनी राधानगरी तालुका वगळता अन्यत्र दौरा केला नाही. घरात बसून नियुक्ती पत्रे दिली. अशी टीका कदम यांनी केली. यावेळी सुनील मोहिते, सुनील देसाई, प्रणती कदम, मोतीलाल चव्हाण, पुष्पराज पाटील आदी उपस्थित होते.