रायगड हादरला: कर्जतमध्ये स्कूलबसमध्ये पाच वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार, क्लीनर अटकेत

रायगड : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वदप गावातील शाळेच्या बसमध्ये अवघ्या पाच वर्षांच्या दोन मुलींवर बस क्लीनरने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. करण दीपक पाटील या आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्जत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मुलींच्या मेडिकल तपासणीत लैंगिक अत्याचाराची पुष्टी झाली असून, या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्हा हादरला आहे. या प्रकाराची तुलना बदलापूरमधील पूर्वीच्या प्रकरणाशी केली जात असून, पालकांमध्ये जबरदस्त संताप आहे. “आता आपल्या मुलींना शाळेत सुरक्षित कसं पाठवायचं?” असा सवाल संतप्त पालक करत आहेत.
राजकीय हस्तक्षेपाचा आरोप
या प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप समोर आला आहे. पीडित मुलींपैकी एका आईने दावा केला आहे की, शिंदे गटाचे सरपंच रोहित पाटील यांनी आरोपीला वाचवण्यासाठी पोलिस ठाण्यात अवैध जमाव जमवून, पीडितांच्या पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरपंचावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
बस मालकावरही चौकशीची मागणी
यासोबतच बस मालक कमलेश ठाकरे याचीही जबाबदारी ठरवून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. अशा विकृत घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे आणि प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.