वातावरणातील बदलामुळे माशांचा दर वाढला

मुंबई : वातावरणातील बदलामुळे मासेही दूर गेले आहेत. याचा परिणाम माशांचा दर वाढला आहे. गेल्या आठवड्यात मुंबईच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्राच्या विस्तीर्ण पसरलेल्या भागात दाट धुके होते. या धुक्यामुळे समुद्रातील मासे किनाऱ्याजवळील १५-२० नॉटिकल मैलांच्या त्यांच्या सामान्य श्रेणीतून बाहेर पडून उष्ण पाण्याच्या दिशेने गेले आहेत.हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्वेकडील वाऱ्यांमुळे मुंबईतील धुके समुद्राकडे सरकले आहे. ते सध्या किनाऱ्यापासून ४० ते ५० नॉटिकल मैल पसरले आहे. दाट धुक्यामुळे मासेमारीच्या जहाजांची दृश्यमानता २ किमीपर्यंत कमी झाली आहे.
मासेमारीच्या बोटी आणि ट्रॉलरना आता १०० नॉटिकल मैल (भारताचे प्रादेशिक पाणी २०० नॉटिकल मैलांपर्यंत) जाण्यासाठी बरेच इंधन वापरावे लागते. मासे उबदार पाण्यात स्थलांतरित होत असल्याने, जाळ्यात कमी मासे येत आहेत ज्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये मच्छीच्या किमती वाढत आहेत. साधारणपणे वर्सोव्याजवळ पकडले जाणारे बोंबिल आता पालघरच्या पलीकडे गुजरातच्या दिशेने आढळतात. पापलेट मुंबईच्या पाण्याच्या पलीकडे गेले आहे. हे बदल थेट हवामानाच्या परिस्थितीशी संबंधित आहेत. असे, मच्छीमार संघटनेचे प्रमुख देवेंद्र तांडेल आणि राजहंस टपके यांनी सांगितले.