संतोष देशमुख हत्या प्रकरण: आज बीड कोर्टात निर्णायक सुनावणी, काय असेल कोर्टाचा निर्णय ?

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात आज बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने आपण निर्दोष असल्याचा दावा करत कोर्टाकडे दोषमुक्ततेसाठी अर्ज केला आहे. आज त्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष कोर्टाच्या निर्णयाकडे लागले आहे.
या खटल्यात विष्णू चाटे या दुसऱ्या आरोपीने देखील आपल्याला लातूरच्या तुरुंगातून बीडमध्ये हलवावे, असा अर्ज केला आहे. त्यावरही आज युक्तिवाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपींना कोर्टात प्रत्यक्ष हजर न करता सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याची व्यवस्था करण्यात येण्याची शक्यता आहे.
मागील सुनावणीत आरोपीच्या वकिलांनी मागितलेली डिजिटल आणि गोपनीय कागदपत्रे सादर करण्यात आली होती. तसेच संतोष देशमुख यांच्या मारहाणीचा एक व्हिडिओ न्यायालयात सादर करण्यात आला, जो आरोपींकडूनच रेकॉर्ड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या व्हिडिओचे बाह्य प्रसारण टाळावे, अशी विनंती सरकारी पक्षाकडून कोर्टाकडे करण्यात आली आहे.
उज्वल निकम सुनावणीसाठी अनुपस्थित असणार
विशेष सरकारी वकील उज्वल निकम आजच्या सुनावणीसाठी अनुपस्थित असणार आहेत, मात्र मागील सुनावणीत त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते की, वाल्मिक कराडने मागितलेली कागदपत्रे देण्यात आली असून, सीलबंद पुरावे उघडल्यानंतर कोर्टात सादर केले जातील.
याशिवाय, वाल्मिक कराडच्या संपत्तीवर CID तपास करत असून, त्या संदर्भातील सुनावणी देखील लवकरच होणार आहे. या प्रकरणाच्या चार्ज फ्रेमिंग प्रक्रियेला सुरुवात होते का, याकडे आज विशेष लक्ष लागले आहे.