विकासाचा प्रस्ताव अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी सादर करा-आ. अमल महाडिक
![विकासाचा प्रस्ताव अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी सादर करा-आ. अमल महाडिक](https://majhamaharashtra.in/uploads/images/202502/image_750x_67a39e976bd3b.jpg)
कोल्हापूर( प्रतिनिधी ) शहरालगच्या गावांची गावठाण हद्द वाढवणं, त्या जमीनींची मोजणी करून संबंधित नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देणं, विमानतळ विस्तारीकरण, क्रीडा संकुल, शिवाजी स्टेडीयम, हॉकी स्टेडीयम, गांधी मैदान आणि ग्रामीण भागात क्रीडांगणं विकसित करण्यासाठी २०० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. ट्रक टर्मिनल, कचरा व्यवस्थापन, आयटी पार्कसाठी जमीन, तामगाव रस्ता, केंद्रीय विद्यालय, उड्डाण पुलाजवळ वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठोस नियोजन करण्याच्या सूचना आमदार अमल महाडिक यांनी प्रशासनाला दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रांतधिकारी हरिष धार्मिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, तहसीलदार स्वप्निल रावडे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, भूमी अभिलेखचे अधीक्षक शिवाजीराव भोसले, क्रीडा अधिकारी अरूण पाटील, सुधाकर जमादार यांच्यासह विमानतळ आणि विविध विभागांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
कोल्हापूर शहरालगतच्या गावांच्या गावठाण हद्दीत वाढ करणं, वाढीव क्षेत्राची ड्रोनद्वारे मोजणी करून त्याचे स्वतंत्र नकाशे बनवणं, नाविन्यपूर्ण योजनेतून या मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड देणं याबद्दल चर्चा झाली. शासकीय दंत महाविद्यालयासाठी शेंडा पार्क इथली साडेसात एकर जमीन देण्याबाबत चर्चा झाली. विभागीय क्रीडा संकुल, हॉकी स्टेडीयम, गांधी मैदान, शिवाजी स्टेडीयम तसंच मुडशिंगी, उजळाईवाडी आणि पेठवडगाव इथं नवीन क्रीडांगणं उभारण्यासाठी २०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केंद्र सरकारकडं करणार असल्याचं आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं.
तावडे हॉटेल जवळ ट्रक टर्मिनलसाठी २३ एकर जागा आरक्षित करण्यात आलीय. त्यापैकी जी जागा ताब्यात आहे, त्या जागेवर ट्रक टर्मिनल करण्याची सुचना आमदार अमल महाडिक यांनी दिली. विमानतळ विस्तारीकरण आणि तामगावकडं जाणार्या रस्त्याबद्दल जलद गतीनं कार्यवाही करण्याचं बैठकीत ठरलं. विमानतळाशेजारच्या गावातील कचरा व्यवस्थापन करण्याची बैठकीत चर्चा झाली. गायरानामधील जागा कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन जिल्हाधिकार्यांनी दिलं. त्याचप्रमाणं कसबा बावडयातील वॉटर पार्कच्या जागेचा विकास करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना आमदार महाडिक यांनी दिल्या आहेत.