शरद इंजिनिअरिंगमध्ये रविवारी अविष्कार २०२४ संशोधन प्रकल्पांची स्पर्धा; राज्यभरातून ३३५ महाविद्यालये सहभागी
यड्राव प्रतिनिधी: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये रविवार (ता.८) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अंतर्गत 'अविष्कार २०२४' हि संशोधन प्रकल्प स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून विदर्भ, औरंगाबाद, नाशिक-जळगाव, लातूर-नांदेड, सोलापूर-पुणे व कोल्हापूर-सातारा ह्या सहा विभागातून ३३५ महाविद्यालयातून २०० पेक्षा अधिक संघ आंतर विद्यापीठीय स्पर्धेत निवड झाली असून ते सर्व संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते होणार आहे.
विद्यार्थ्याच्या नाविण्यपूर्ण वैज्ञानिक प्रतिभा ओळखून त्यांना संशोधनक्षमता विकसित करण्यासाठी संधी प्रदान करणे तसेच संशोधनाचा दर्जा वाढविण्यासाठी संशोधकांमध्ये स्पर्धात्मकता निर्माण करणे या उदिष्टांसह विद्यार्थ्यामध्ये संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्राचे तात्कालिक माननीय राज्यपाल आणि महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठांचे कुलपती यांनी २००६-०७ या शैक्षणिक वर्षापासून आविष्कार-महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ संशोधन अधिवेशन सुरु केले आहे.
यामध्ये पदवी, पदव्युत्तर आणि पदव्युत्तेतर अशा तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर सहा क्षेत्रांमध्ये विद्यार्थी त्यांच्या संशोधनाची मांडणी पोस्टर व मॉडेलच्या स्वरुपात सादर करणार आहेत. रविवारी दिवसभर या स्पर्धा होणार असून ६ परिक्षकांच्या माध्यमातून प्रकल्प संकल्पना निवडून आंतर राज्य स्पर्धेसाठी पाठविले जाणार आहेत.