शिक्षक,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर व बचत गटांच्या सेवाभावाला राजे पुरस्कारातून प्रोत्साहन

शिक्षक,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर व बचत गटांच्या सेवाभावाला राजे पुरस्कारातून प्रोत्साहन

कागल (प्रतिनिधी) - सहकारातील आदर्श नेतृत्व दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या नावाने शैक्षणिक,वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या शिक्षक,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर व बचत गटांच्या सेवाभावाला याही वर्षी राजे विक्रमसिंह घाटगे पुरस्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येणार आहे. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थच्या या पुरस्कारासाठी संबधितांनी प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन राजे बँकेच्या अध्यक्षा व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदितादेवी घाटगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षण,वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या घटकांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे, तसेच त्यांच्या कार्यातून इतरांनीही आदर्श घ्यावा.हा या पुरस्कारामागील उद्देश आहे.गेल्या सहा वर्षांपासून शिक्षकांसाठी, तर मागील वर्षापासून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व बचत गटांनाही हा सन्मान देण्यात येत आहे.

या उपक्रमाला शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे तसेच शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांची संकल्पना व प्रेरणा लाभली आहे. सन २०२५ च्या पुरस्कारांची घोषणा येत्या २८ जुलै रोजी, स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीदिनी करण्यात येणार आहे.

शिक्षकांसाठी प्राथमिक व माध्यमिक विभागात स्वतंत्र पुरस्कार असून,सर्व पुरस्कार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार गुणांकन पद्धतीने केली जाते.प्रस्ताव फॉर्म श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कागल (दिलीप निकम), सिद्धनेर्ली विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सिद्धनेर्ली (अनिल वाघमोडे) आणि राजे फाउंडेशन कार्यालय, गडहिंग्लज व उत्तूर येथे उपलब्ध आहेत. तसेच इच्छुकांना https://surveyheart.com/form/6682700c79a05076b31e300d या वेबसाईटवरून ऑनलाइन पद्धतीनेही प्रस्ताव सादर करता येणार आहेत.

इच्छूकांनी आपले प्रस्ताव विहित नमुन्यात भरून ३ जुलै २०२५ ते १५ जुलै २०२५ या दरम्यान वरील ठिकाणी किंवा आॕनलाईन पध्दतीने जमा करावेत असे आवाहन नवोदितादेवी घाटगे यांनी केले आहे.