शिवाजी विद्यापीठात २७ फेब्रुवारीपासून ‘स्पार्क’ फिल्म फेस्टिव्हल

शिवाजी विद्यापीठात २७ फेब्रुवारीपासून ‘स्पार्क’ फिल्म फेस्टिव्हल

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. फिल्म मेकिंग कोर्सच्या वतीने दि. 27 आणि 28फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय ‘स्पार्क’ फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. फेस्टिव्हलमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आणि फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त लघुपट व माहितीपटांचे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. शिवाय यावेळी उपस्थित प्रेक्षकांशी माहितीपट व लघुपटांचे दिग्दर्शक संवाद साधणार आहेत.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते दि. 27 रोजी सकाळी साडेदहा वाजता फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे. हा फेस्टिव्हल विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागात होणार आहे.

दोन दिवस चालणार्‍या फेस्टिव्हलमध्ये सचिन सूर्यवंशी यांच्या ‘वारसा’ आणि ‘सॉकर सिटी’, संजय दैव यांची ‘देशकरी’, रोहित कांबळे यांची ‘देशी’, मेधप्रणव पोवार यांची ‘हॅपी बर्थ डे’, नितेश परुळेकर यांची ‘बॅकयार्ड’, उमेश बगाडे यांची ‘अनाहूत’, सुधीर गुरव यांची ‘लागीर’, स्वप्नील पाटील यांची ‘मधुबाला’ आणि उमेश बोळगे यांची ‘काजवा’ आदी लघुपट आणि माहितीपटांचा समावेश आहे. हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून लघुपट व माहितीपट पाहण्यासाठी तसेच दिग्दर्शकांशी संवाद साधण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बी. ए. फिल्म मेकिंग कोर्सचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.