संतोष देशमुखांना आधीच मिळाली होती धोक्याची सूचना ; पोलिस तपासातून नवा खुलासा

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. पोलीस तपासातून समोर आलेल्या नव्या खुलाश्यानुसार, संतोष देशमुख यांना त्यांच्या हत्येच्या तीन दिवस आधीच म्हणजे ६ डिसेंबर रोजी धोक्याची सूचना मिळाली होती. गोपनीय साक्षीदाराने त्यांना फोन करून सांगितले होते की, “सुदर्शन घुले आणि त्याची गँग तुम्हाला सोडणार नाही.” तसेच, त्यांनी घुले आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, संतोष देशमुख यांनी ही टीप गांभीर्याने घेतली नाही आणि कोणतीही कारवाई केली नाही. न्यूज18 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.
पोलीस तपासात गोपनीय साक्षीदाराने दिलेल्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाल्मीक काराडचे सर्व साथीदार नेहमी खंडणी मागतात. या अगोदर मलाही वाल्मीक कराड यांनी धमकी दिली होती, खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले होते. संतोष देशमुख यांनी जर वेळीच पोलिसांत तक्रार केली असती, तर कदाचित त्यांचा जीव वाचू शकला असता, असे आता सांगण्यात येत आहे.
बीड मधील पोलीस यंत्रणा आणि आरोपींशी असलेले त्यांचे साटेलोटे यावरून संतोष देशमुख यांनी तक्रार केली असती, तरी पोलीसांनी ती किती गांभिर्याने घेतली असती हा प्रश्नच आहे. उलट पोलीसांनी आरोपींना सूचना करून संतोष देशमुख यांनाच त्रास दिला असता अशी चर्चाही यामुळे सुरू झाली आहे. एकूणच बीडमधील तेव्हाची पोलीस यंत्रणा वाल्मिक कराड आणि गँगसाठीच काम करत होती त्यामुळेच संतोष देशमुखांनी सूचना मिळून देखील तक्रार केली नसावी अशी शक्यता देखील यामुळे वर्तवली जात आहे.