संधी शोधता आली की संशोधक जन्मतो - प्रा. डॉ. ज्योती जाधव

संधी शोधता आली की संशोधक जन्मतो - प्रा. डॉ. ज्योती जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये "नवसंवाद २०२४ सन्मान नारी शक्तीचा.. जागर विचारांचा.." या नवरात्रीनिमित्त आयोजित अनोख्या व्याख्यानमालेचे आठवे पुष्प शिवाजी विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभागप्रमुख व "जॅगरी क्वीन" म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या शास्त्रज्ञ प्रा. डॉ. ज्योती जाधव यांनी गुंफले.

याप्रसंगी *"सोशल रिसर्च"* या विषयावर बोलताना *प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. ज्योती जाधव* म्हणाल्या, "आपल्या अवतीभवती असणाऱ्या संधी शोधता आल्या की संशोधक जन्माला येतो. प्रतिकूल परिस्थितीतच विद्यार्थी कणखर बनतो. मुलींनी शिक्षण आणि कौटुंबिक जबाबदारी दोन्ही सांभाळणे आवश्यक आहे. स्त्रीत्व असल्याचा अभिमान बाळगायला शिका. त्याग केल्याशिवाय यश संपादन होत नाही. सगळ्यात अवघड काम करायला घेतले तर स्पर्धा कमी असते. विद्यार्थिनींनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. आपला फोकस योग्य दिशेला असणे गरजेचे आहे. आपले संशोधन समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. शिक्षणाचा उपयोग आपल्या कुटुंब व समाजासाठी करा. आपल्याला आपल्या अस्तित्वाची आणि कर्तृत्वाची जाणीव असायला हवी." 

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. पी. बी. घेवारी यांनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थिनींना व्यावसायिक शिक्षणाबरोबरच जीवनमूल्ये, अध्यात्म, आदर्श जीवनशैली, संतुलित आहार-विहार, व्यक्तिमत्व विकास आदी गोष्टींची जाणीव-जागृती होण्यासाठीच नवसंवाद या व्याख्यानमालेचे आयोजन केल्याचे उपप्राचार्य प्रा. पी. बी. घेवारी यांनी सांगितले. 

यावेळी रिसर्च अँड डेव्हलपमेंट डीन डॉ. व्ही. के. ठोंबरे यांनी प्रमुख वक्त्यांची ओळख करून दिली. तर आभार प्रदर्शन आयक्यूएसी डीन डॉ. बी. ए. जाधवर यांनी केले. यावेळी स्टुडंट अफेयर्स डीन डॉ. जे. एम. शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. दिग्विजय पवार आदी उपस्थित होते. 

सूत्रसंचालन गायत्री कदम यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राध्यापिका व विद्यार्थिनी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.