समरजितसिंह घाटगे दिल्लीहून थेट भोसले नाट्यगृह दुर्घटनास्थळी दाखल

समरजितसिंह घाटगे दिल्लीहून थेट भोसले नाट्यगृह दुर्घटनास्थळी दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराज यांच्या पुढाकारातून व त्यांचे बंधू श्रीमंत पिराजीराव घाटगे तथा बापूसाहेब महाराज यांच्या देखरेखीखाली रोममधील थिएटरच्या धर्तीवर उभारलेले कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासह खासबाग कुस्ती मैदानाच्या व्यासपिठास लागलेल्या आगीमुळे हा अनमोल ठेवा भस्मसात झाला.कोल्हापूरचे हे वैभव पूर्ववत उभारण्यासाठी सर्वांनी पुढे यावे.त्यासाठी प्रशासनास लागेल ते सहकार्य करू.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. दुर्घटनास्थळी दिलेल्या भेटीनंतर ते बोलत होते.

 जळीत दुर्घटनेनंतर घाटगे यांनी शाहू ग्रुप मार्फत सर्वप्रथम दहा लाख रुपयांची देणगी या नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीसाठी जाहीर केली.त्यानंतर शासन तसेच विविध लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा यासाठी पुढाकार घेतलेला आहे.

 याबाबतचे पत्र त्यांनी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व शहर अभियंता हर्षदीप घाटगे यांना दिले.यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.

 घाटगे पुढे म्हणाले, जळीताची घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी आहे. शासकीय पातळीवर हे वैभव नव्याने उभारण्यासाठी प्रयत्न होतीलच. पूर्वीच्या शाहूकालीन वास्तु प्रमाणेच ती नव्याने उभारणे आवश्यक आहे. कोल्हापूरकरांनी ही यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे.छत्रपती शाहू महाराजांचे जनक घराण्याचा वंशज म्हणून यासाठी आपण अग्रभागी राहू

*...आणि समरजीतराजे गहिवरले*

श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय साखर महासंघाकडून मिळालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर दिल्लीहून कोल्हापूरमध्ये परतल्यानंतर विमानतळावरून थेट संगीतसूर्य केशवराव भोसले या नाट्यगृह या दुर्घटनास्थळी त्यांनी भेट दिली.कोल्हापूरचे वैभव व छत्रपती शाहू महाराजांच्या कलात्मकतेचा अनमोल नमुना असलेल्या कलाकृतीची भगनावस्था पाहताना त्यांच्या जीवाची घालमेल सुरु होती. खासबाग मैदानाच्या व्यासपीठाजवळ आल्यानंतर दिमाखात उभी असलेली खासबाग अक्षरे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील व्यासपिठासह नाट्यगृहाची भग्नावस्था पाहून घाटगे यांना गहिवरून आले व ते निशब्द झाले.