हज यात्रेसाठी गेलेल्या एक हजार भाविकांचा उष्माघाताने मृत्यू
सौदी अरेबियामध्ये यंदाच्या हज यात्रेच्या दरम्यान उष्माघातामुळे सुमारे एक हजार भाविकांचा मृत्यू झाला असून शेकडो भाविक रुग्णालयात उपचार घेत आहेत. हज यात्रेदरम्यान तापमान 52 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते, ज्यामुळे उष्माघाताचे अनेक प्रकरणे घडली आहेत. बुधवारी तब्बल ५५० हज यात्रेकरुंचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता या मृतांच्या संख्येत वाढ झाली असून मृतांची संख्या सध्या एक हजारावर पोहोचली आहे.
उष्णतेच्या तीव्रतेमुळे आणि हज यात्रेतील भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सौदी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. मुख्य चौकांमध्ये मिस्टींग सिस्टम आणि पाण्याचे स्टेशन लावण्यात आले आहेत, तसेच काही जागांवर वातानुकूलन व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तरीही, मोठ्या प्रमाणावर बाहेर राहावे लागल्यामुळे उष्माघाताच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
हज यात्रेतील भाविकांमध्ये उष्माघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि त्यांना योग्य उपचार देण्यासाठी सौदी आरोग्य मंत्रालयाने उष्माघात व्यवस्थापनासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने, हज यात्रेकरता येणाऱ्या भाविकांना योग्य तयारीसाठी आणि उष्णतेपासून संरक्षणासाठी सूचना देण्यात येत आहेत. यामध्ये छत्री, टोपी, आरामदायक बूट, तसेच पुरेसा पाण्याचा साठा ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.