अशोकराव माने इन्स्टिट्यूशन्सच्या संचालकपदी डॉ. एस. आर. चौगुले यांची नियुक्ती

अशोकराव माने इन्स्टिट्यूशन्सच्या संचालकपदी डॉ. एस. आर. चौगुले यांची नियुक्ती

 कोल्हापूर (प्रतिनिधी) - वाठार येथील श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या (स्वायत्त) संचालकपदी प्रा. डॉ. एस. आर. चौगुले यांची नियुक्ती झाली. डॉ. चौगुले इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विषयाच्या तज्ञ प्राध्यापक असून त्यांना शैक्षणिक क्षेत्रात २९ वर्षांचा अनुभव आहे.

गेल्या २९ वर्षांमध्ये त्यांनी शिवाजी विद्यापीठ संलग्नित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या तसेच स्वायत्त महाविद्यालयांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागामध्ये प्राध्यापक, विभागप्रमुख, डीन म्हणून कार्य केले आहे. डॉ. चौगुले यांचे आतापर्यंत ११५ हून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध भारतासह इतर देशांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यांनी तीन पेटंट दाखल केले आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या विविध समित्या व अभ्यास मंडळावर कार्य केले आहे. सध्या त्या सहा आंतरराष्ट्रीय नियतकालिकांचे समीक्षक म्हणून कार्यरत आहेत. 

पदभार स्वीकारताना डॉ. एस. आर. चौगुले म्हणाल्या, “ग्रामीण भागातील व गरजू विद्यार्थ्यांना व्यवसायिक शिक्षणाची संधी देणाऱ्या या संस्थेमध्ये कार्य करताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर देण्याचा माझा मानस आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच महाविद्यालयाला नजीकच्या काळात विविध मानांकने प्राप्त होण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्या व विद्यापीठांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर संधी देण्यात येईल. उपलब्ध सोयीसुविधा अधिक सक्षम करण्यात येतील. प्राध्यापकांनी अध्यापनाबरोबरच संशोधन क्षेत्रात आपले योगदान दिले पाहिजे.”

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, जि. प. सदस्या मनीषा माने, कॅम्पस डायरेक्टर प्रा. पी.बी. घेवारी, एच. आर. प्रियांका सुतार व सर्व डीन, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.