‘एकात्म मानव दर्शन’ व्याख्यान हीरक महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

‘एकात्म मानव दर्शन’ व्याख्यान हीरक महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मुंबई येथील रुईया महाविद्यालयात ‘एकात्म मानव दर्शन’ या विचारसरणीचे विवेचन करणारी व्याख्याने दिली होती. एप्रिल २०२५ मध्ये या ऐतिहासिक व्याख्यानांना ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे ‘एकात्म मानव दर्शन’ हे लोककल्याणकारी विचार युवा पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी तसेच राज्यातील युवा वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमांबाबत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्या संयोजनातून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शासनाच्या सूचनांनुसार विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, शासन स्तरावरून आलेल्या आदेशांनुसार शालेय स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करावे. सुरुवातीला निबंध स्पर्धांचे आयोजन करून, पुढील टप्प्यात शासनाकडून प्राप्त होणाऱ्या कार्यक्रमपत्रिकेनुसार अंमलबजावणी करावी. अशासकीय सदस्यांनी सुचविल्यानुसार, शिवाजी विद्यापीठाचा सहभाग या कार्यक्रमांमध्ये घेण्यात यावा. जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीने कार्यक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव वाय. बी. पाटील यांनी कार्यक्रमांची रूपरेषा सादर केली. यावेळी आयटीआयचे प्राचार्य म.शि. आवटे, प्राचार्या सुषमा शिंदे, डॉ. रेश्मा पाटील, पोलीस उपनिरीक्षक किरण कागलकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, अशासकीय सदस्य ॲड. स्वागत परुळेकर आणि ॲड. अनिता भुर्के उपस्थित होते.