'ज्वेलरी क्लस्टर' साठी सहपालकमंत्र्यांची मान्यता ; आवश्यक बाबी पूर्ण करण्याच्या सूचना

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहपालकमंत्री व नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचेशी आज ज्वेलरी व्यवसायाला चालना मिळण्यासाठी कोल्हापुरात ज्वेलरी क्लस्टर होणे आवश्यक आहे यासंदर्भात अतिशय महत्वाची बैठक झाली. या बैठकीत सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी ज्वेलरी क्लस्टर योजनेला तत्वतः मान्यता दिली असून पुढील बाबी पुर्ण करण्याची सुचना केली.
यावेळी सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन महाराष्ट्र राज्य व गोल्ड व्हल्युअर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य या दोन्ही संघटनांच्या वतीने मंत्री माधुरी मिसाळ यांना आभार मानत दोन्ही संस्थांचे अध्यक्ष नचिकेत भुर्के यांनी निवेदन दिले.
या मंजुरीमुळे कोल्हापुरात सोने चांदी कारागीर यांच्यासाठी ज्वेलरी क्लस्टर होण्याच्या प्रक्रीयेला वेग मिळेल. यावेळी ज्वेलरी क्लस्टर ही योजना कारागीरांसाठी होणे किती महत्वाचे आहे हे सहपालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणले.
कोल्हापूर प्रमाणेच मुंबई, नाशिक, नागपूर येथे CFC सेंटर सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन व गोल्ड व्हल्युअर्स फेडरेशन या दोन संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या संघटनांच्या वतीने होण्यासाठीची मागणीही करण्यात आली.
या बैठकीत उपाध्यक्ष प्रकाश घाटगे, सचिव गोपीनाथ नार्वेकर, खजानिस विजय औंधकर व दोन्ही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.