तिळवणी प्लॉट फेरफार प्रकरणी पुन्हा 'तारीख पे तारीख ' - सुनील गायकवाड

तिळवणी प्लॉट फेरफार प्रकरणी पुन्हा 'तारीख पे तारीख ' - सुनील गायकवाड

कोल्हापूर -  तिळवणी ता. हातकणंगले येथील सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी ७५० स्क्वेअर फुटाचा प्लॉट हडप करून घरगडयाच्या नावावर केला आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर सुनील गायकवाड यांनी आरोप केले आहेत. गायकवाड हे 21 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजले पासून उपोषणास बसले होते. प्रशासनाच्या कार्यवाहीसाठी 21 दिवसांच्या मुदतीला प्रतिसाद म्हणून तब्बल 27 तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी उपोषण स्थगित केले. तीन वेळा उपोषण करूनही प्रशासन पुन्हा मदत मागत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली." प्रशासनाला लाज वाटायला हवी " अशा जळजळीत शब्दात त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. 

प्लॉट हडप प्रकरणात सरपंचांना बेकायदेशीर मदत करणाऱ्या ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे यांना बडतर्फ करावे , गटविकास अधिकारी शबाना मोकाशी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्यावर कारवाई करावी, सरपंचांना अपात्र ठरवून घरगडाच्या नावावर प्लॉट करण्याच्या ठरावाला पाठिंबा देणाऱ्या सरपंच व सदस्यांवर कारवाई करून ग्रामपंचायत व तंटामुक्ती समिती बरखास्त करावी या मागण्यांसाठी गेली दोन वर्षे आंदोलन करणारे गायकवाड हे उपोषणाला बसले होते. तटस्थ चौकशी अधिकारी नेमून चौकशी अहवालानंतर 21 दिवसात नियमानुसार कारवाईच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी उपोषण स्थगित केले परंतु न्याय न मिळाल्यास पुन्हा उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. 

शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख जयदीप सरवदे , विनोद जाधव यांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण थांबवले. गायकवाड यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या चार बहिणीही उपोषण स्थळी होत्या ; माणुसकीच्या नात्याने रात्री जिल्हा परिषदेच्या ' हिरकणी ' कक्षात वा पोर्चमध्ये बहिणींना झोपण्याची व्यवस्था व्हावी ही गायकवाड यांची विनंती प्रशासनाने मान्य केली नाही. आमदार अशोक माने यांच्या फोन नंतरही प्रशासनाने नकार दिला परिणामी बहिणींना रात्रभर रस्त्यावरच उघड्यावर झोपावे लागले.