नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालणारा 'हा' थरारक चित्रपट पाहिलात का..?

नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालणारा 'हा' थरारक चित्रपट पाहिलात का..?

मुंबई (प्रतिनिधी) - गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांनी विविध मर्डर मिस्ट्री वेब सिरीज आणि चित्रपटांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. अशा थरारक कथा पाहण्याची प्रेक्षकांची आवड लक्षात घेता, आता एक नवा स्पॅनिश क्राइम थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. 

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला 'अ विडोज गेम' हा चित्रपट एका खऱ्या घटनेवर आधारित असून, एका विधवेच्या गुन्हेगारी प्रवासाची थरारक कथा मांडतो. हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे आणि आतापर्यंत 15.4 मिलियन व्ह्यूज मिळवून गाजत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्लोस सेडेस यांनी केले आहे.

चित्रपटाची मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे माजे नावाची एक महिला, जिला तिच्या पतीच्या हत्येच्या कटात सामील असल्याचा संशय आहे. माजे आपल्या प्रियकर साल्व्हेसोबत मिळून हे क्रौर्य घडवते आणि या कटात इतरांनाही अडकवते. माजेचं व्यक्तिमत्त्व गुंतागुंतीचं आणि धक्कादायक आहे. ती विवाहित असूनही अनेक प्रेमसंबंध ठेवते, सतत नवनवीन ओळखी घेते आणि खोट्या कथा रचून दुहेरी आयुष्य जगते. तिचा पती आर्टुरो एक साधा, कुटुंबवत्सल माणूस असतो, तर माजेच्या मनात कायम काहीतरी अधिक, रोमांचक हवं असतं. शेवटी, ती आपल्या पतीच्या हत्येचा प्लॅन आखते.

ही हत्या उघडकीस येते का? माजे आणि साल्व्हे यांना शिक्षा होते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 'अ विडोज गेम' हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना मिळणार आहेत. या थरारक चित्रपटात इवाना बैकेरो, कारमेन माची आणि ट्रिस्टन उलोआ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.