पाकिस्तानच्या 'या' क्रिकेटपट्टूमुळे आमिर खानच्या वैवाहिक आयुष्यात वादळ ..?

मुंबई - अभिनेता आमिर खान आणि रीना दत्ता यांनी 14 मार्च 1986 रोजी गुपचूप विवाह केला होता. दोघंही एकमेकांचे शेजारी होते आणि ओळख वाढत गेली तसे प्रेमात पडले. मात्र रीनाच्या घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी कोणालाही न कळवता लग्न केलं. एका मुलाखतीत आमिरनं आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही आठवणी शेअर करत सांगितलं की, लग्नाच्या दिवशी भारत - पाकिस्तान क्रिकेट सामना सुरू होता. तोच ऐतिहासिक सामना, ज्यात जावेद मियांदादनं शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता.
सगळे त्या सामन्यात इतके रममाण होते की, आम्ही घरात नाही हे कोणाच्या लक्षातच आलं नाही. मीही सामन्यात गुंतलो होतो. पण जावेदच्या त्या षटकारानं आमच्या आयुष्याला वळण दिलं, असं आमिरनं सांगितलं.
आमिरनं पुढं खुलासा केला की, मियांदादचा तो षटकार फक्त सामनाच नाही, तर त्याचं वैवाहिक आयुष्यही काही काळ बिघडवून गेला. एकदा मी मियांदाद यांना विमानात भेटलो. मी त्यांना म्हणालो, जावेद भाई, तुम्ही हे काही बरोबर केलं नाही. त्या षटकारामुळे मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो, असंही तो हसत हसत म्हणाला.
लग्नानंतर काही महिन्यांनी आमिर - रीना यांच्या लग्नाची बातमी घरच्यांना समजली. त्यामुळे रीनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि तिच्या कुटुंबीयांनी काही काळासाठी संबंध तोडले. मात्र नंतर परिस्थिती हळूहळू सुधारली. आमिरची बहीण फरहत हिने रीनाचा भाऊ राजीव याच्याशी लग्न केलं आणि दोन्ही कुटुंबं पुन्हा एकत्र आली.आमिर आणि रीना तब्बल 16 वर्षं एकत्र होते. मात्र, 2002 साली त्यांचा घटस्फोट झाला.