माध्यमांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अपरिहार्य: सम्राट फडणीस

कोल्हापूर : माध्यमांतील तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. या तंत्रज्ञानापासून दूर राहता येणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तंत्रज्ञानाच्या विस्ताराचा वेग आणखी वाढला असल्याने त्याला वगळून पत्रकारिता करता येणार नाही. ही कृत्रिम बुद्धिमत्ता संकट नसून माध्यमांसाठी अपरिहार्य तंत्रज्ञान आहे, असे मत दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीचे संपादक सम्राट फडणीस यांनी आज व्यक्त केले.
मराठी पत्रकार दिनानिमित्त राज्यातील नऊ विद्यापीठांतील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माध्यमे’ या विषयावर फडणीस यांचे विशेष ऑनलाईन व्याख्यान झाले.
सम्राट फडणीस म्हणाले, मुद्रित माध्यमांच्या प्रारंभीच्या काळात तंत्रज्ञानाच्या वाढीचा वेग कमी होता. इंटरनेट आल्यानंतर तंत्रज्ञानाच्या विस्ताराची गती वाढली. गेल्या दहा वर्षात हे तंत्रज्ञान अतिशय झपाट्याने विस्तारले असून माध्यमांचे अंतरंग त्यामुळे बदलून गेले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आगमनानंतर माध्यमांवर खूप मोठा परिणाम होत आहे. इंग्रजी माध्यमात सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रभावीपणे केला जात आहे. भाषिक पत्रकारितेत अनेक नवे प्रयोग सुरू असून येत्या पाच वर्षांत भाषिक पत्रकारिता कृत्रिम बुद्धिमत्तेने व्यापली जाणार आहे. पत्रकारितेतील बातमीदारी जरी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे करता येणे लगेच शक्य नसले तरी बातमी लेखन, भाषांतर, संहिता लेखन, निवेदन, लेख आदी क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्ता अतिशय अचूकपणे काम करेल. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगची माध्यम क्षेत्रात अगामी काळात प्रचंड गरज भासणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला नेमके प्रश्न विचारण्याची क्षमता पत्रकारांना विकसित करावी लागणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेतून आलेल्या उत्तरांची शहानिशा करण्याचे कौशल्यही पत्रकारांना अंगिकारावे लागणार आहे.
फडणीस म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकर्या जातील किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता कामे हिरावून घेईल, ही भीती अनाठायी आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक नव्या नोकर्याही तयार होणार आहेत. माध्यम व्यवसायात सुरुवातीपासून तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. तंत्रज्ञानाशिवाय माध्यमांत व्यवसाय होऊ शकत नाही. व्यावसाय वाढवायचा असेल तर कृत्रिम बुद्धिमत्तेला स्वीकारण्याशिवाय माध्यमांकडे पर्याय उरत नाही. पत्रकारांनीही आपली उत्सुकता आणि सजगता जागृत ठेऊन नव्या तांत्रिक गोष्टी शिकून घेणे बदलत्या काळात आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर भटकर यांनी केले. डॉ. गोपी सोरडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शिवाजी जाधव यांनी आभार मानले. ऑनलाईन व्याख्यानाला विविध विद्यापीठांच्या पत्रकारिता विभागातील शिक्षक, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.