मेतकेत बाळूमामा भक्तनिवासचे २९ रोजी लोकार्पण

मेतकेत बाळूमामा भक्तनिवासचे २९ रोजी लोकार्पण

कागल (प्रतिनिधि): मूळ क्षेत्र मेतके (ता. कागल) येथील सद्‌गुरू बाळूमामा चौरटेबल ट्रस्टने उभारलेल्या भक्तनिवास अन्नछत्राचे लोकार्पण येत्या गुरुवारी (दि. २९ ऑगस्ट) होत आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अयोध्या श्रीराम मंदिर-जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष व मधुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष प. पू. गोविंददेव गिरी महाराज, रामनाथ गिरी मठ नूलचे मठाधिपती प. पू. भगवानगिरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

संत सद्‌गुरू बाळूमामा यांच्या आयुान्यातील बराचसा भाग ज्या भूमीमध्ये व परिसरात गेला ते गाव म्हणजे मेतके. याच मेतके गावची ख्याती आता मूळ क्षेत्र म्हणून सर्वदूर पसरली आहे. याच गावात स्वतः बाळू‌मामांनी १९३२ मध्ये आपले दैवत श्री हालसिद्धनाथ मंदिराची स्थापना करून येथे भंडारा महोत्सवही सुरू केला.

आज हेच मंदिर श्री हालसिद्धनाथ-बाळूमामा मंदिर म्हणून देशभरात प्रसिद्ध झाले आहे. या ठिकाणी महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून मोठ्या संख्येने भाविक येतात. पण या ठिकाणी भक्तांच्या निवासाची सोय नव्हती. त्यामुळे लांबून येणाऱ्या भक्तांची अडचण होत होती. त्यानंतर दूस्टने हा विषय हातात घेतला व सहा गुंठे जागेत सुसज्ज व दुमजली हे भक्तनिवास उभे केले. यात खालील भागात अन्नछत्र व पहिल्या मजल्यावर भक्तनिवास उभारले आहे. त्यामुळे आता भाविकांच्या निवासाची चांगली सोय होणार आहे. अन्नछत्र येथे आधीपासूनच आहे त्याचे आता केवळ या नव्या जागेत स्थलांतर होईल.

या इमारतीचे लोकार्पण गुरुवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीनंतर गोविंददेव गिरी महाराज प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये कुतूहल आहे.

या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टचे कार्याध्यक्ष पापा पाटील- कौलवकर व अध्यक्ष आर. डी. पाटील यांनी केले आहे.