शासनाच्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत सचिन देसाई प्रथम
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिक्षकांच्यामध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावरील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी 'राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती' या खुल्या व अभिनव स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत सचिन देसाई प्रथम पटकाविले आहेत.
यामध्ये अध्यापक विद्यालयासह इ १ ली ते १२ वी पर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना सहभाग घेण्यास आवाहन करण्यात आले होते. इयत्ता व विषयनिहाय विशेष गट करुन यामध्ये तालुकास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत भरघोस बक्षीसे सुद्धा ठेवण्यात आली होती. या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित स्पर्धेची कार्यवाही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्याकडून नुकतीच पूर्ण झाली असून राज्यस्तर विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांची यादी घोषित करण्यात आली आहे. यामध्ये भुदरगड तालुक्यातील विद्या मंदिर नाधवडे येथे कार्यरत असणारे उपक्रमशील शिक्षक सचिन देसाई यांनी इयत्ता ६ ते ८ समाजशास्त्र विषय गटातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवारी २९ सप्टेंबर रोजी मान्यवारांच्या उपस्थितीत पुणे येथे होणार असून रोख रुपये ५० हजार व प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरुप असणार आहे.
या स्पर्धेत केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारितच व्हिडिओ बनवणे बंधनकारक होते. अध्यापनात रंजकता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,कॉपीराईट कायद्याचे पालन, शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगता, विषयाची मांडणी,सादरीकरण, व कल्पकता या निकषांच्या आधारे दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओचे परीक्षण करण्यात आले. यासाठी प्रत्येक स्तरावर गठन करण्यात आलेल्या विविध समित्यामार्फत वस्तुनिष्ठ व पारदर्शक मूल्यमापनद्वारे ही प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून राज्यस्तरावर यश संपादन करणाऱ्या ८४ शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे. या स्पर्धेत राजतील हजारो शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. यातील उत्कृष्ट ठरलेले सर्व ई-साहित्य शासनाच्या वेबसाइडवर उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
पुरस्कार विजेते शिक्षक सचिन देसाई यांचे दीक्षा साहित्य निर्मितीतही महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांच्या स्वनिर्मित 'स्मार्ट एज्युकेशन' या शैक्षणिक यू टयूब चॅनेलला सुद्धा राज्यभरातून विक्रमी प्रतिसाद लाभला आहे. या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, शिक्षणाधिकारी मिना शेंडकर,डॉ.एकनाथ आंबोकर,डायट प्राचार्य राजेंद्र भोई,
गटविकास अधिकारी डॉ शेखर जाधव, गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, विस्ताराधिकारी प्रबोध कांबळे, उत्तमराव पाटील, केंद्रप्रमुख डी डी पाटील यांच्यासह सर्व स्तरातील शिक्षणप्रेमीकडून अभिनंदन करण्यात आले.