शिंदे गटाची फोडाफोडी सुरू; सतेज पाटलांचे शिलेदार शिंदे गटाच्या वाटेवर?

शिंदे गटाची फोडाफोडी सुरू; सतेज पाटलांचे शिलेदार शिंदे गटाच्या वाटेवर?

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश देत पुढील चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग आला असून, बैठका, चर्चा आणि राजकीय जुळवाजुळव सुरू झाली आहे. याच दरम्यान, फोडाफोडीच्या हालचालींना गती मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात राजेश क्षीरसागर यांना विजय मिळवून देत सतेज पाटील यांना धक्का दिला होता. आता पुन्हा एकदा शिंदे गटाने सतेज पाटील यांना दुसऱ्यांदा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधील काही माजी नगरसेवक तिकीट न मिळाल्याने नाराज झाले होते. या नाराज नेत्यांवर शिंदे गटाने लक्ष ठेवून त्यांना आपल्या गटात सामावून घेण्यासाठी खुल्या ऑफर दिल्या आहेत. कोल्हापुरात दहापैकी दहा जागांवर महायुतीने विजय मिळवला असल्यामुळे जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढली आहे. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण या दोन विधानसभा मतदारसंघांत 81 प्रभाग आहेत.  उत्तरमध्ये 53 तर दक्षिणमध्ये 28 प्रभाग. सध्या राजेश क्षीरसागर (शिंदे गट) आणि अमल महाडिक (भाजप) यांच्याकडे या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षासोबत जाण्यासाठी अनेक इच्छुक आहेत.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवरून माजी नगरसेवकांत वाद झाले होते. त्यानंतर राजू लाटकर यांनी काँग्रेसचा पाठिंबा घेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, मात्र त्यांना राजेश क्षीरसागर यांनी पराभूत केले. या पराभवानंतरही काँग्रेसमधील काही माजी नगरसेवक नाराज आहेत.

जिल्ह्यात महाविकास आघाडीत सतेज पाटील हे एकमेव भक्कम नेते मानले जात आहेत. मात्र त्यांनाच शिंदे गटाने दुसऱ्यांदा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षात सक्रिय नाहीत. हीच नाराजी लक्षात घेऊन शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी देशमुख यांच्याशी चर्चा सुरू केल्याची माहिती आहे. त्यांना विविध ऑफर दिल्याचे समजते.

काँग्रेसमध्ये देशमुख यांच्यासोबत ३० हून अधिक माजी नगरसेवकांमध्ये नाराजीचे सूर आहेत. यामध्ये माजी महापौर, माजी सभापती, उपमहापौर यांचा समावेश आहे. त्यापैकी काहींनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय पक्का केल्याची चर्चा आहे. लवकरच पक्षप्रवेशाची तारीख आणि वेळ निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी पाच वर्षे महापालिकेवर सत्ता टिकवून ठेवली होती. मात्र आता त्यांच्या काही शिलेदारच शिंदे गटाकडे झुकत असल्यामुळे त्यांना धक्का मानला जात आहे. यामुळे नाराजी दूर करण्यासाठी सतेज पाटील पुढील काही दिवसांत स्नेहभोजनाचे आयोजन करणार असल्याचेही समजते. त्यामुळे सतेज पाटील आपले गड आणि शिलेदार टिकवण्यात यशस्वी होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.