संतोष देशमुख हत्या प्रकरण : धनंजय देशमुख यांची मोठी मागणी, म्हणाले...
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे दोन महीने झाले तरी अध्याप पोलिसांच्या हाती सापडलेला नाही. तर दुसरीकडे ज्या आरोपींनी हत्या केली त्यांच्यावर मकोका लावण्यात आला. मात्र कोणतीही शिक्षा झालेली नाही. वाल्मिक कराड आतमध्ये असून त्यालाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे विष्णु चाटे याचा मोबाईलही अजून मिळालेला नाही. सरपंचांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी हाच महत्त्वाचा पुरावा असलेल्या मोबाईलच्या शोधासाठी पुन्हा एकदा रिमांड घेण्यात यावी अशी मागणी केली आहे.
काय म्हणाले धनंजय देशमुख ?
विष्णू चाटे याचा मोबाईल सापडत नसल्याच्या प्रकरणात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु केवळ गुन्हा दाखल करून भागणार नाही तर त्या मोबाईल मध्ये असलेले पुरावे नष्ट झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का? असा सवाल उपस्थित करत धनंजय देशमुख यांनी या मोबाईलच्या शोधासाठी सर्व आरोपींचे पुन्हा एकदा रिमांड घ्या आणि मोबाईल शोधून काढा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
'त्या' मोबाईल मध्ये नेमक काय होतं ?
विष्णू चाटेचा मोबाईल संतोष देशमुख यांची हत्या होऊन 58 दिवस झाले तरी अद्याप पोलीस यंत्रणेला सीआयडीला सापडलेला नाही. यामुळे या मोबाईल मध्ये नेमके काय होते असा प्रश्न कायम असून त्याचा शोध घेण्यासाठी आता पुन्हा एकदा या सर्व आरोपींची रिमांड घ्यावे अशीच मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे आज देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यातच असून ते या प्रकरणावर काही भाष्य करतात का हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.