Kolhapur Crime : पोलिस दाम्पत्याची एसटी चालकाला मारहाण ; व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

Kolhapur Crime : पोलिस दाम्पत्याची एसटी चालकाला मारहाण ; व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एस.टी. बसला ओव्हरटेक करण्यासाठी रस्ता न दिल्याच्या कारणावरून पोलिस दांपत्य आणि एस.टी. चालक यांच्यात वाद उफाळून आला. वाद एवढा टोकाला गेला की संतप्त पोलिस दांपत्याने थेट बसचालकाला मारहाण केल्याची घटना नावली गावाजवळ घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

पन्हाळा तालुक्यातील वाघबीळपासून निघालेली एक एस.टी. बस नावलीकडे निघाली होती. दरम्यान, बससमोर एक कार वारंवार अडथळा ठरत होती. एस.टी. चालकाने अनेक वेळा हॉर्न वाजवून कारला साइड देण्यास सांगितलं, पण कारचालकाने बसला ओव्हरटेक करण्याची संधी दिली नाही. नावली गावाच्या पुढे जाऊन शेवटी एस.टी. चालकाने कारला ओव्हरटेक करून थांबवलं आणि कायद्याच्या चौकटीत विचारणा केली.

परंतु, ही कार एका पोलिस दांपत्याची असल्याचं समोर आलं. कारमधील पोलिस अधिकारी आसिफ कलायगार आणि त्यांची पत्नी हाफिबा कलायगार हे दोघं गाडीत होते. एस.टी. चालकाच्या साध्या प्रश्नावरही दोघांचा पारा चढला आणि त्यांनी चालकाची कॉलर पकडून त्याला दमदाटी केली. "मी पोलीस आहे, तुला मी सोडत नाही," असं म्हणत मारहाण केली.

तक्रार दाखल – व्हिडिओ व्हायरल

या प्रकारामुळे एस.टी. चालकाने कोडोली पोलिस ठाण्यात पोलिस दांपत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी दांपत्यावर सरकारी कर्मचाऱ्यावर हात उचलण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.