Pune Crime : पुण्यात भररस्त्यात कोयता गँगचा थरार, तरुणावर केला हल्ला

पुणे : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी आता पुणे पोलिसांसाठी मोठे आव्हान बनली आहे. अशातच दत्तवाडी परिसरात कोयता गँगकडून एका तरुणावर भररस्त्यात अमानुष हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सात ते आठ जणांच्या टोळक्याने हातात कोयते व अन्य धारदार शस्त्रे घेऊन एका तरुणाचा पाठलाग केला. आपला जीव वाचवण्यासाठी धावणारा तरुण वळणावर कोसळताच त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. हल्लेखोरांनी त्याला थांबवण्याची एकही संधी न देता रस्त्यावरच रक्तबंबाळ केलं.
या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
पोलिसांनी प्राथमिक तपासात हल्ल्यामागे पूर्ववैमनस्य असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.