"विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार: ईव्हीएमवर प्रश्नांची सरबत्ती"

"विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार: ईव्हीएमवर प्रश्नांची सरबत्ती"

मुंबई वृत्तसंस्था: विधानसभेत महायुतीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडत असताना विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी शपथ घेण्यास नकार दिला आहे. आदित्य ठाकरे, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांसारख्या नेत्यांनी ईव्हीएमवरील संशय, निवडणुकीतील पारदर्शकतेचा अभाव, आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले

"जनतेने दिलेला कौल आहे की निवडणूक आयोगाचा? एवढ्या मोठ्या विजयानंतरही जल्लोष नाही. मार्कडवाडी गावातील मॉकपोलच्या मागणीवरही कर्फ्यू लावून लोकांना दडपले. २०१४ पासून लोकशाही मारण्याचे काम सुरू आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला.

"मार्कडवाडीतील लोकांची मागणी म्हणजे बॅलेट पेपरवर निवडणूक, पण प्रशासनाने ती मागणी धुडकावली. पाच वाजेपर्यंतचे मतदान प्रमाण एक तर नंतरचे वेगळे कसे? ईव्हीएमवरील शंकांना सामोरे जायला हवे," असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

"आझाद मैदानावरील सोहळ्यावर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. हे सरकार जनतेतलं नाही, म्हणून आम्ही शपथ न घेण्याचा निर्णय घेतला," असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेत्यांनी लोकशाही रक्षणासाठी मोर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर पुढील दिशानिर्देश ठरवण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, आणि राहुल गांधींसोबत चर्चा होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.